- आनंद सुरवाडेलोकमत न्यूज नेटवर्कजळगाव : माझे साडेतीन वर्षांचे बाळ जळगावात होते. त्यावेळी साक्री तालुक्यातील शेलबारी उपकेंद्रात नियुक्ती झाली होती. सुरुवातीचा काळ कठीण होता. मात्र, पाड्यावरील रहिवाशांचे जीवनमान उंचावण्यासाठी त्यांच्यात मिसळून, त्यांनाच कुटुंब मानत उत्तम आरोग्यसेवा देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आणि चौदा वर्षांच्या आरोग्यसेवेचे फळ म्हणून या पुरस्कारासाठी माझी निवड झाली, अशा भावना राष्ट्रीय ‘फ्लॉरेन्स नाइटिंगेल’ पुरस्कारप्राप्त आरोग्यसेविका प्रेमलता संजय पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केल्या आहेत. ‘लोकमत’ने घेतलेल्या मुलाखतीत त्यांनी त्यांचा कार्यकाळ मांडला.
प्रश्न : आदिवासी भागात सेवा देतानाचे अनुभव कसे होते?सुकापूर आरोग्य केंद्रांतर्गत शेलबारी उपकेंद्रात पहिलीच नियुक्ती मिळाली. तेथे काम करू शकणार नाही, घरी परतेल, असेच सर्वांना वाट होते. मात्र, दोनच महिन्यांत मी या सहा पाड्यांवरील रहिवाशांची बोलीभाषा अवगत केली. सिकलसेलबाबत जागृती केली, आरोग्याचे सर्व कार्यक्रम पोहोचविले. बाळापासून दूर राहण्याच्या वेदना होत्याच, मात्र, आदिवासी भागातील आरोग्यसेवेचे समाधानही तेवढेच होते. एक वेळ मी पाड्यावरील बालकांसाठी खोबऱ्याचे तेल दिले होते. मात्र, दुसऱ्या दिवशी सर्व महिलांनी ते तेल डोक्याला लावले होते. तेव्हा मला समजले की, या ठिकाणी जागृती खूप महत्त्वाची आहे.
पुरस्कारासाठी निवड झाल्यानंतर काय भावना आहेत?२००६ पासून आरोग्यसेवेत कार्यरत आहे. यात तुम्हाला सेवाही करायची संधी मिळते, त्याचा मोबदलाही मिळतो. त्यामुळे काम करीत असताना पुरस्काराबाबत कधीच विचार केला नव्हता, कल्पनाही नव्हती. केवळ आपल्याला प्रामाणिक काम करायचे आहे, ऐवढेच मनात होते. मात्र, यात कुटुंबाचे, सर्व वरिष्ठांचे, सर्व सहकाऱ्यांचे अत्यंत उत्तम पाठबळ आणि सहकार्य मिळाले.
कुटुंब आणि सेवा यात कसा समन्वय साधला?माझी सेवा ही कुटुंबापासून लांब असल्याने माझ्या बाळापासून मी दूर होते. पतींसह सर्वच कुटुंबाचे मोठे पाठबळ मिळाले. मला एक मुलगी आहे. दुसऱ्या अपत्याचा आम्ही सेवेमुळे विचार केलाच नाही. साक्री तालुक्यातील सेवेनंतर सहा वर्षे मी रावेर तालुक्यातील चिनावल आरोग्य केंद्रात होते. या सर्वच ठिकाणी कुटुंबांतील सर्व सदस्यांचे मोठे पाठबळ मला मिळत गेले आणि मी आरोग्यसेवा प्रामाणिकपणे बजावू शकले.
‘फ्लॉरेन्स नाइटिंगेल’ पुरस्कारप्राप्त प्रेमलता पाटीलआरोग्य यंत्रणा आता अधिक सक्षम झाली आहे. अनेक अत्याधुनिक बदल झाले आहे. कोरोना काळात सर्वच आरोग्य कर्मचाऱ्यांनी अगदी झोकून पूर्ण वेळ सेवा दिली आहे. तुम्ही प्रामाणिक काम केल्यास त्याचे फळ मिळतेच, मग ते क्षेत्र कुठलेही असो. - प्रेमलता पाटील, आरोग्यसेविका