लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोनाच्या या संकटात दाते हे कसल्या ना कसल्या मार्गे सेवा देत आहेत.. आपल्याकडील उपलब्ध साधनांचा सेवेसाठी कसा वापर करता येईल, याचे उत्तम उदाहरण समोर ठेवत आहेत. त्याच धर्तीवर विजय बागडे हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल रुग्णांच्या नातेवाइकांना मोफत पाणी वाटप करून त्यांची तहान भागविण्याचे मोठे कार्य करीत आहेत. गरीब नातेवाइकांची तहान भागविण्यात मोठे समाधान असल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत.
कोरोनाचा कहर सुरू झाला गेल्या वर्षी मार्चपासून. तेव्हापासून लोकांचे स्थलांतर सुरू झाले. अशा वेळी रस्त्यांनी हजारो किलोमीटर पायी चालणारे कुटुंबच्या कुंटुब विना पाण्याने बरेच अंतर कापत होते; मात्र अशा कुटुंबीयांना पाणी देण्यापासून विजय बागडे यांनी या सेवेला सुरुवात केली. असे कुटुंब ज्या ठिकाणीही थांबलेले असायचे त्यांना ते आपल्या मालवाहू गाडीत पाण्याची टाकी ठेवून त्याद्वारे त्यांच्यापर्यंत पाणी पोहोचवत होते. अनेक वेळा तर मध्यरात्रीही त्यांनी अशा लोकांना त्यांच्या प्रवासात पुरेल ऐवढे पाणी दिले.
१३०० लीटर पाणी वाटप
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय तसेच इकरा या ठिकाणी एक १३०० लिटरची टाकी भरली की दिवसभरातून सकाळ, दुपार संध्याकाळ जावून घोषणा करून नातेवाइकांना पाणी देण्याचे काम विजय बागडे करीत आहेत. दिवसभरात १३०० लिटर पाणी वाटप होत असल्याचे त्यांनी सांगितले.
दिवसभरात किती पाणी विकत घेणार!
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल रुग्णांचे नातेवाईक गरीब, गरजू असतात. दिवसभर थांबायचे म्हटले तरी दिवसभरातून ते किती पाणी विकत घेतील...आधिच संकटात असलेल्यांना किमान पाणी देऊ शकलो तरी बस.. हा विचार मनात आला आणि गेल्या वर्षभरापासून तीन वेळा पाणी वाटप करून हजारो लोकांची तहान भागविली...माझा मुलगा कृणाल बागडे हा सोबत असतो.. असे विजय बागडे यांनी सांगितले.
पाण्यासोबत जागृतीही
मोफत पाणी देऊन नातेवाइकांची तहान भागविण्यासोबतच कोरोना हा कसा आजार आहे. त्यापासून तुम्ही कसे स्वत:चा बचाव करू शकता, याबाबत विजय बागडे यांनी वाहनावर ध्वनिक्षेपक बसविला असून, त्याद्वारे संदेशातून जनजागृतीही ते करीत आहेत. नातेवाइकांना गर्दी न करता व्यवस्थित रांगेत उभे करून ते पाणी वाटप करीत असतात. गेल्या दीड वर्षांपासून ही सेवा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.