हिरव्या वेलदोड्याच्या भावात २२०० रुपयांनी घसरण
देशासह अमेरिकेतील आवक वाढली : २६०० रुपये प्रतिकिलोवर आले भाव
जळगाव : मसाल्यातील प्रमुख घटक असलेल्या हिरव्या वेलदोड्याचे भाव कमी-कमी होत असून गेल्या वर्षाच्या तुलनेत यामध्ये दोन हजार २०० रुपये प्रतिकिलोने घसरण होऊन ते दोन हजार ६०० रुपये प्रतिकिलोवर आले आहेत. देशातील उत्पादन वाढण्यासह अमेरिकेतून येणाऱ्या वेलदोड्याचेही प्रमाण कमी वाढल्याने ही घसरण होत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
जळगावात मसाल्याची मोठी बाजारपेठ आहे. वेलदोड्याचे भाव पाहता गेल्या एक ते दोन वर्षात मोठी वाढ झाली होती. मात्र यंदा आवक चांगली असल्याने वेलदोड्याचे भाव कमी होण्यास मदत होत आहे.
दरवर्षी जुलैच्या अखेर व ऑगस्टच्या सुरुवातीला नवीन वेलदोडे येण्यास सुरुवात होते व नोव्हेंबर अखेरपर्यंत नवीन तयार माल बाजारपेठेत येतो. गेल्या वर्षी मात्र नेमके त्याच वेळी अति पावसाचा फटका बसल्याने वेलदोड्याच्या बाजारपेठेवर त्याचा मोठा परिणाम झाला होता. काही व्यापाऱ्यांनी गोदामात ठेवलेला मालही ओला झाल्याने त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले होते. त्यामुळे बाजारात वेलदोड्याची आवक कमी-कमी होत गेली व भाव वाढतच गेले होते. देशातील वेलदोड्याची आवक घटली असताना अमेरिकेतून येणाऱ्या मालाचेही प्रमाण कमी झाले. तसेच त्या वेळी अमेरिका व इराण यांच्यातील तणावामुळेही आवकवर परिणाम होत गेला. त्यामुळे देशी-विदेशी मालाची कमतरता भासत असल्याने भाव चांगलेच वाढत गेले होते. परिणामी हिरवे वेलदोडे थेट ४ हजार ८०० रुपये प्रति किलोवर पोहचले होते.
मात्र आता देशातील केरळ व इतर भागासह अमेरिकेतील आवकही सुधारल्याने वेलदोड्याचे भाव कमी होण्यास मदत होत आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसामध्ये ४ हजार ८०० रुपये प्रतिकिलोवर असलेल्या वेलदोड्याच्या भावात दोन हजार २०० रुपयांची घसरण होऊन ते दोन हजार ६०० रुपये प्रति किलोवर आले आहेत.
देशातील वेलदोड्याचे उत्पादन वाढण्यासह अमेरिकेतून होणारी आयातही वाढली आहे. त्यामुळे वेलदोड्याचे भाव कमी होत असून ते आता दोन हजार ६०० रुपये प्रति किलोवर आले आहेत.
- सुरेश बरडिया, मसाला व्यापारी, जळगाव.