जळगाव - कोरोनाच्या काळात स्वत:च्या कुंटुंबाची काळजी न करता निर्भिडपणे शहरातील रस्त्यांची साफसफाई करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांचा कुंटुंबासह १५ ऑगस्ट रोजी महापालिकेतर्फे सत्कार करण्यात यावा अशी मागणी अखिल भारतीय सफाई मजदूर संघातर्फे करण्यात आली आहे. याबाबत संघाचे जिल्हाध्यक्ष अजय घेंगट यांनी मंगळवारी महापौर जयश्री महाजन यांना निवेदन दिले.
पाऊस नसल्याने सातपुड्यात पर्यटकांची पाठ
जळगाव - जिल्ह्यात यंदा पावसाने पाठ फिरवली असल्याने जिल्ह्यातील छोट्या प्रकल्प देखील कोरडेठाक आहेत. सातपुड्यात पावसाळ्यात सर्व प्रकल्प हे ओसंडून वाहत असतात. मात्र, यावर्षी अनेरपासून ते अंबापाणीपर्यंतच्या सर्वच प्रकल्पांमध्ये जेम-तेम जलसाठा आहे. त्यात चिंचपाणी, अंबापाणी, वाघझिरा, निंबादेवी या सातपुड्याचा पायथ्याशी असलेल्या लहान प्रकल्पांच्या क्षेत्रात पाऊस न झाल्यामुळे यावर्षी सातपुड्यात पर्यटकांनी पाठ फिरवली आहे. मनुदेवी परिसरातदेखील पर्यटक जात नसल्याने याठिकाणच्या व्यवसायिकांचा व्यवसाय देखील पुर्णपणे ठप्प झाला आहे.
गिरणा पोखरण्याचे काम सुरुच
जळगाव - जिल्ह्यातील एकही वाळू गटाचा लिलाव झाला नसतानाही तालुक्यातील गिरणा नदी पात्रात मात्र भर दिवसा वाळूचा अनधिकृतपणे उपसा केला जात आहे. मात्र, महसुल प्रशासनाने या प्रश्नी पुर्णपणे दुर्लक्ष केले आहे. आव्हाणे, खेडी, फुपनगरी व भोकणी या भागात तर वाळू गटाचा लिलावच झाला आहे अशा प्रकारे उपसा केला जात आहे. गिरणा पात्रात सकाळी ११ वाजेपर्यंत १०० पेक्षा अधिक डंपर, ट्रॅक्टर व्दारे उपसा केला जात आहे.