चाळीसगाव : बडोदा संस्थांचे महाराज सयाजीराव गायकवाड यांनी प्रजाहितदक्ष राजे म्हणून ऐतिहासिक पानांवर आपली तेजोमय मुद्रा अलंकृत केली आहे. मालेगाव जवळील कौळाणे ही त्यांची जन्मभूमी. कौळाणे ते बडोदा नरेश हा त्यांचा प्रवासही रोमहर्षक आहे. चाळीसगावचे हौशी सायकलवीर अरुण महाजन व टोनी पंजाबी यांनी रविवारी महाराज गायकवाड यांच्या कौळाणे जन्मभूमीला सायकलवर जाऊन अभिवादन केले.
चाळीसगाव ते कौळाणे ही १४० कि.मी.ची सायकलफेरी त्यांनी अवघ्या सात तासातच पूर्ण केले. दर रविवारी ऐतिहासिक व पर्यटन स्थळांना भेटी देण्याचा संकल्प येथील हौशी सायकलवीरांनी केला आहे. या ग्रुपमध्ये २५ हून अधिक सदस्य असून ते वेगवेगळ्या स्थळांना भेटी देत असतात. मध्यंतरी अरुण महाराजन व टोनी पंजाबी यांना एक हजार किमी सायकल स्पर्धेत एसआरचा किताबही मिळाला आहे. ६० वर्षीय रवींद्र पाटील हेही हौशी सायकलवीर असून त्यांनी २०० व ४०० किमी सायकल स्पर्धा यशस्वी केली. याच ग्रुपचे सदस्य जिजाबराव वाघ यांनी देखील सायकलवर चाळीसगाव तालुक्याची परिक्रमा करून नवा अध्याय अधोरेखित केला आहे. गेल्या रविवारी या सायकलवीरांनी वेरुळची सायकलवारीही यशस्वी केली.
चौकट
पहाटेच 'कौळाणे'कडे कूच
चाळीसगावच्या पश्चिमेला मालेगाच्या पुढे कौळाणे हे गाव आहे. चाळीसगावपासून एका बाजूने हे अंतर ७० कि.मी. आहे. परतीच्या प्रवासासह हा प्रवास एकूण १४० किमीचा झाला.
अरुण महाजन व टोनी पंजाबी यांनी पहाटे पाच वाजता येथील सिग्नल चौकातून सायकलला कौळाणेच्या दिशेने पायडल मारले. सकाळच्या अंगावर येणाऱ्या हवेत सायकल चालविणे जिकिरीचे होत होते. मात्र प्रसन्न वातावरणात सायकलचे पायंडल वेगाने फिरत होते.
१...सकाळी आठ वाजता पंजाबी व महाजन यांच्या सायकली कौळाणेत पोहचल्या. चाळीसगावहून सायकलवर प्रवास करून आलेल्या सायकलवीरांना पाहून कौळाणेकर चांगलेच भारावले. त्यांनी सायकलवीरांचे स्वागत केले. यावेळी सायकलवीरांनी सयाजीराव गायकवाड यांच्या महालाला भेट देत माहिती जाणून घेतली
कौळाणे सयाजीराव गायकवाड यांची जन्मभूमी
बडोदा नरेश यांनी कौळाणे येथील गायकवाड परिवारातील सयाजीराव यांना दत्तक घेतले होते. बडोदा संस्थानासाठी वारस शोध मोहीमच त्यांनी राबवली होती. यासाठी मध्यप्रदेशसह महाराष्ट्रातील कौळाणे गावात त्यांनी योग्य वारसाचा शोध घेतला. कौळाणे येथील गायकवाड परिवारातील तीन भावंडांना त्यांनी बडोदा येथे आणले. पुढे परीक्षा घेत सयाजीराव गायकवाड यांना दत्तक घेत बडोदे गादीवर त्यांना विराजमान केले. कालांतराने आपल्या जन्मभूमीची आठवण म्हणून सयाजीराव गायकवाड यांनी कौळाणे गावात अतिशय देखणा महाल उभारला. ही भव्य वास्तू पाहण्यासाठी देशभरातील इतिहास अभ्यासक, पर्यटनप्रेमी येथे येत असतात.
महाराज सयाजीराव गायकवाड यांच्या लोकहितैषी कार्यासह बडोदे संस्थानाची ख्यातीही तेवढीच अजरामर आहे. त्यांच्या जन्मभूमी कौळाणे गावाला सायकलवर प्रवास करून भेट देण्याचा आनंद संस्मरणीय आहे. त्यांनी उभारलेला भव्य महाल पाहून आम्ही भारावून गेलो.
-टोनी पंजाबी / अरुण महाजन
एसआर सायकलिस्ट, चाळीसगाव.