जळगाव : दुष्काळाच्या दुष्टचक्रातून सुटका झालेल्या जळगाव जिल्ह्यात मे महिन्यात होणारी भूजल पातळी मोजणी अर्थात मान्सूनपूर्व सर्वेक्षण १५ मे नंतर होणार आहे. गेल्या दोन वर्षांपासून भूजल पातळीत चांगलीच वाढ असल्याने जिल्ह्यासाठी ही दिलासादायक बाब ठरली. आता उन्हाळ्यात होणारी भूजल मोजणी कशी राहणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेकडून जळगाव जिल्ह्यात ६६ पाणलोट क्षेत्रात असलेल्या १७८ विहिरींच्या जलपातळीची नोंद भूजल सर्वेक्षणात घेतली जाते. यामध्ये जानेवारी, मार्च, मे व सप्टेंबर महिन्यात भूजल मोजणी केली जाते. सप्टेंबर २०२० मध्ये केलेल्या भूजल सर्वेक्षणात जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात भूजल पातळी वाढल्याची नोंद झाली. गेल्या पाच वर्षांची तुलना पाहता सलग दोन वर्षे भूजल पातळीत वाढ झाली. गेल्या वर्षी झालेल्या दमदार पावसामुळे भूजल पातळी वाढण्यास मदत झाल्याचे सांगण्यात आले. याशिवाय जानेवारी व मार्च महिन्यात देखील झालेल्या सर्वेक्षणात भूजल पातळीत वाढ झाल्याचे आढळून आले होते.
मान्सून पश्चात सर्वेक्षणात वाढ झाल्याचे आढळून आल्यानंतर आता मान्सूनपूर्व सर्वेक्षण होणार असल्याने भर उन्हाळ्यात जिल्ह्यातील भूजल पातळीची काय स्थिती आहे, हे समोर येऊ शकेल. त्यानुसार हे सर्वेक्षण १५ मे नंतर सुरू होणार आहे.