जळगाव : गांधी रिसर्च फाउंडेशन आणि तेलबिया संशोधन केंद्र, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने भुईमूग लागवड तंत्रज्ञान संबंधी मार्गदर्शन प्रशिक्षण चोपडा तालुक्यात सातपुडा दुर्गम भागातील गौऱ्यापाडा येथे पार पडले. तसेच यावेळी आदिवासी उपयोजना कृषी निविष्ठा वाटप ही करण्यात आले.
भुर्ईमूग लागवड तंत्रज्ञानबाबत प्रशिक्षण कार्यक्रमात प्रामुख्याने तेलबियांची ओळख करून देण्यात आली. आपल्या दैनंदिन जीवनात तेलाचे महत्त्व अनन्य साधारण आहे. भुईमूग, तीळ, सूर्यफुल, सोयाबीन व करडई हे तेलबिया पिके घेतले जातात. सातपुडा पर्वत रांगांमध्ये मोहाच्या बियांपासून तेल निर्मिती केली जाते. त्यामुळे तेलबिया उत्पादनाला स्थानिक उद्योगाच्या दृष्टिकोनातून पाहिल्यास त्या भागात तेलघाणा उद्योग सुरू होऊन शेतकऱ्यांना जास्त उत्पादन मिळू शकते. त्यासाठी गांधी रिसर्च फाउंडेशन आणि तेलबिया संशोधन केंद्र आपल्या सोबत आहे, असे प्रतिपादन डॉ. सुदाम पाटील यांनी यावेळी केले.
प्रशिक्षणात सहभागी ५० शेतकऱ्यांना मोफत फवारणी यंत्राचे प्रा. ए.ए. शेख आणि गांधी रिसर्च फाउंडेशनचे सुधीर पाटील यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. याप्रसंगी डॉ. गिरीश चौधरी आणि डॉ. एस.एस. नवले यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वितेसाठी गांधी रिसर्च फाउंडेशनचे स्वयंसेवक सागर चौधरी, चंद्रकांत चौधरी, प्रशांत सूर्यवंशी, विक्रम अस्वार, माजी पंचायत समिती सभापती टेमऱ्या पावरा, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश पावरा, गीताबाई पावरा व ग्रामस्थ यांनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक सागर चौधरी, सूत्रसंचालन दिनेश पाटील तर आभार चंद्रकांत चौधरी यांनी मानले.