रावेर - तालूक्यातील सातपुड्याच्या पायथ्यापासून ते थेट तापीमाईच्या सुपीक पठाराच्या उशाशी हतनूरसह सुकी, आभोडा, मंगरूळ, गंगापूरी, मात्राण व चिंचाटी अशा लहान मोठी सहा धरणे असली तरी अत्यल्प, अनियमित व अकाली झालेल्या पावसामुळे यंदा उन्हाळ्यातील एप्रिल - मे जाणवणारी भूजलाचे संकट गत डिसेंबरच्या उत्तरार्धापासूनच घोंघावू लागले आहे. तालूक्याच्या पुर्व भागातील खानापूर, निरूळ, पाडळे, चोरवड, कर्जोद, या भागासह सुकीकाठचा परिसरात भूजलसंकटाची कमालीची गंभीर दाहकता निर्माण झाली असून, या दीड महिन्यात सहा ते सात मीटरने भूजलपातळी घसरल्याने धरणांच्या या तालूक्यात मका गहू, हरभऱ्यासह १९ हजार हेक्टरमधील रब्बी हंगामाचा घास भूजलसंकटाच्या घशात अडकला असून आजमितीस शेतकरीबांधव कमालीचे चिंताक्रांत झाले आहेत. रावेर तालूक्याला केळीच्या समृद्धीचे गतवैभव असलेल्या खर्या यशाचे गमक हतनूर, सुकी, आभोडा, मंगरूळ, गंगापूरी, मात्राण व चिंचाटी या लहानमोठी धरणांच्या सप्तजलतारकांना जाते. यंदा पाऊस अकाली,अपुर्ण व अनियमीतपणे झाल्याने ही धरणं नुसतीच आकडेवारीने १०० टक्के तुडूंब भरलीत. पण भूजलपातळी वृध्दींगत करण्यासाठी पावसाळ्यात पुरांअभावी सातपुड्यातून वाहून येणाऱ्या सुकी, भोकर, नागोई, मात्राण नद्या नाले मात्र दुथडी भरून न वाहिल्याने भूजल सिंचनाचा प्रश्न " आ"वासूनच राहिला. परिणामतः भर पावसाळ्यात डोळे वटारणार्या पावसाने शेवटच्या दोन तीन पावसात १०० टक्के पर्जन्यमान व धरणे १०० टक्के तुटूंब भरल्याची माहिती दर्शवली जात असली तरी सात धरणांचा तालूका असलेल्या या तालुक्यात एवढी सात धरणं उशाशी असूनही, डिसेंबर- जानेवारी पूर्वार्धापासूनच या तालुक्याच्या दाही दिशांना भूजलसंकटाची भीषण दाहकता प्रशासनाची व शासनाची झोप उडवणारी ठरली आहे. त्यात भरीस भर म्हणून तालूक्याच्या पुर्व भागातील चोरवड, अजनाड, खानापूर, निरूळ व पाडळे परिसरात राजकीय इच्छाशक्तीअभावी सिंचनाचा अनुशेष आ वासून असल्याने भूजलाच्या संकटाने उग्र स्वरूप धारण केले आहे. खानापूर - चोरवड-निरूळ परिसरात तब्बल ५ ते १० मीटरने भूजलपातळी मकरसंक्रांतीच्या पर्वणीवर होणाऱ्या सूर्याच्या संक्रमणातच घसरली असल्याने गव्हाच्या ओंब्या, हरभऱ्याची घाटे पोषणाच्या अवस्थेत असतांनाच, रब्बीच्या हंगामासाठी पाणी व्यवस्थापन मोडकळीस आल्याने रब्बी हंगामाचा घास भूजलसंकटाच्या घशात अडकला आहे. किंबहुना, रब्बीच्या हंगामाचा ऐन तोंडी आलेला घास निसर्गाचे दृष्टचक्र हाती येवू देते की नाही असे भयानक भूजलाचे संकट गडगडत असल्याने शेतकरीवर्ग कमालीचा हवालदिल झाला आहे. तालुक्यातील रब्बीच्या हंगामासाठी १० हजार ६०० हेक्टर हरभऱ्याचे, तर साडेचार हजार क्षेत्र गव्हाचे, साडेचार हजार हेक्टर क्षेत्र मक्याचे असून एकूण सुमारे १९ हजार हेक्टरमधील रब्बीच्या हंगामाचा घास भूजलसंकटाच्या घशात अडकला असून, शासनाने व लोकप्रतिनिधींनी तत्संबंधी गंभीर दखल घेऊन तातडीने उद्भवणाऱ्या आपात्कालीन परिस्थितीवर मार्ग काढण्यासाठी शेतकरीहितासाठी धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज असल्याचा सूर जनमानसातून व्यक्त होत आहे. कालच, माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांनी सात धरणांचा तालूका अन् समृध्दीचा असलेल्या वारस्याचा धागा पकडत रावेर, यावल व चोपडा तालूके सर्वाधिक भूजल उपसणारे तालूके असल्याने मेगारिचार्ज प्रकल्पाची सर्वांच्या सामुदायिक प्रयत्नांनी कार्यपुर्ती न झाल्यास तीघही तालूक्यात वाळवंट निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही अशी वर्तवलेली गंभीर दाहकता शासनाचे लक्ष केंद्रित केले होते.
भूजल संकटाच्या घशात अडकली मक्याची कणसे, गव्हाची ओंबी व हरभऱ्याचे घाटी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 04, 2018 1:15 PM