वरणगाव, ता.भुसावळ : तालुक्यातील चार गावांच्या सामूहिक पाणीपुरवठा योजनेचे (ग्रामीण प्रादेशिक पाणीपुरवठा योजना) वीज वितरणचे ६४ लाख रुपयांचे वीज बिल थकल्याने वीजपुरवठा खंडित करण्यात आला. त्यामुळे वीज पुरवठ्याअभावी ही पाणी योजना बंद पडली आहे. भुसावळ तालुक्यातील व वरणगाव परिसरातील अंजनसोडे, कठोरा खुर्द, कठोरा बु.।। व फुलगाव या चार गावांना कठोरा खुर्द येथून तापी नदीवरून सामूहिक पाणीपुरवठा योजनेद्वारे पाणीपुरवठा केला जातो. सामूहिक पाणी योजनेचे वीज वितरण कंपनीचे सुमारे ६४ लाख रुपये इतके वीज बिल वर्षानुवर्षे थकीतच राहत असल्याने अखेर वीज वितरण कंपनीने या योजनेचा वीजपुरवठा शुक्रवारी खंडित केला. त्यामुळे पाणीपुरवठा बंद झाला असून या चारही गावांमधील ग्रामस्थांची पाण्यासाठी वणवण सुरू झाली आहे.जि.प.च्या या उरफाट्या कारभारामुळे ऐन उन्हाळ्यात चारही गावांमधील नागरिकांवर पिण्याच्या पाण्यासाठी भटकंतीची वेळ आली आहे.या पाणीपुरवठा योजनेवरील चार ही गावांनी प्रत्येक वर्षाची पाणीपट्टी नागरिकांकडून वसूल करून ती रक्कम जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पुरवठा विभागाकडे वर्ग केली आहे. असे असताना व चारही ठिकाणच्या ग्रामपंचायतींनी जिल्हा परिषदेने आकारलेल्या पाणीपट्टी कराचा भरणा वेळेवर केल्यावरही जि.प.च्या ढिसाळ कारभारामुळे योजनेवरील वीज बिलाची रक्कम जि.प.प्रशासनाकडून वीज वितरण कंपनीकडे अद्यापही भरण्यात न आल्याने वीजपुरवठा खंडित होण्याची वेळ ओढवली आहे. चार गावांची सामूहिक पाणीपुरवठा योजना सुमारे ४० वर्ष इतकी जुनी आहे. या योजनेवरील पाईप लाईन, उद्भव विहिरीसह जलशुद्धीकरण केंद्रातील संयत्र मोडकळीस आले असल्याने कधी यंत्रसामग्रीची दुरुस्ती, शिवाय तापी नदीची जलपातळी कमी झाल्याने अशा विविध कारणांनी ही योजना वारंवार ठप्प होत आहे. त्यामुळे योजनेचे नूतनीकरण होणे अत्यंत आवश्यक आहे. (वार्ताहर)बोदवड - गटातील ३८ तर तळवेल गटातील ४२ गावे अशा ८० गावांना ओडीए प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेकडे वीज बिलाची सुमारे तीन कोटी थकबाकी आहे. थकबाकी भरण्याची नोटीस वीजवितरण कंपनीने बजावली आहे. थकबाकी त्वरित न भरल्यास केव्हाही वीजपुरवठा बंद करण्याची नामुष्की योजनेवर येणार आहे. ३ रोजी सुसरीच्या चार गावांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. त्यामुळे तालुक्यातील सुरवाडा गावाच्या योजनेवरील पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. बोदवड गटाचा वीजपुरवठा अद्याप सुरळीत आहे केव्हाही वीजपुरवठा खंडित होण्याची शक्यता आहे. ८० गावांची ऐन उन्हाळ्यात गैरसोय होण्याची शक्यता आहे. याबाबत ओडीएचे पाणीपुरवठा पं. स.अभियंता बी.सी.पाटील म्हणाले की, थकीत वीज बिल भरण्याची नोटीस मिळाली आहे. वीजपुरवठा ३ रोजी सायंकाळपर्यंत सुरू होता.फुलगाव, कठोरा : सरपंचांची चालू वीज बिल भरण्याची तयारी४ग्रामस्थांचे हाल होऊ नये म्हणून चालू वीज बिल एक लाख १८ हजार रुपये भरण्याची तयारी फुलगावच्या सरपंच ललिता महाजन, कठोरा येथील सरपंच प्रशांत पाटील यांनी जि.प. प्रशासनासह वीज वितरण कंपनीकडे दर्शविली आहे तर थकीत वीज बिल जिल्हा परिषदेने भरावे, अशी मागणी केली आहे.एकूण ६४ लाख रुपयांची थकबाकी असल्याने वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे़ मुळात देखभाल व दुरुस्तीसाठी पैसे नाहीत़ मुख्य कार्यकारी अधिकाºयांकडे अहवाल पाठवण्यात आला आहे़ वरिष्ठ स्तरावरून दखल घेतल्यानंतर पाणीपुरवठा सुरळीत होईल़ -वाय़जी़पाटील, शाखा अभियंता
चार गावांची सामूहिक योजना ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2017 12:32 AM