लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : वन्यजीव संरक्षण संस्थेतर्फे जिल्ह्यातील पाणवठ्यांचे सर्वेक्षण सुरू असून, यामध्ये जलचर आणि त्यांचा अधिवास यावर गौरव शिंदे आणि बाळकृष्ण देवरे हे अभ्यास करत आहेत. सुरुवातीच्या टप्प्यात वाघूर, गिरणा, तापी, मेहरुण तलाव या ठिकाणी केलेल्या सर्वेक्षणात मूळची आफ्रिकेतील तिलापिया मत्स्य प्रजाती मोठ्या संख्येत आढळून येत असल्याचे चित्र आहे. ही प्रजाती जलाशयाच्या दृष्टीने धोक्याची नांदी असून, वेळीच उपाययोजना न केल्यास स्थानिक माशांचे अस्तित्व संकटात सापडू शकते.
शहराचे वैभव असलेल्या मेहरुण तलावात या माशाची संख्या लक्षणीय आहे. त्यापाठोपाठ गिरणा, वाघूर, तापीमध्येदेखील तिलपिया मोठ्या संख्येत आढळत आहेत. यांना जिलेबी, चिलापी अशी नावे असून, याला डुक्कर मासा म्हणूनदेखील ओळखले जाते.
का वाढत जाते आहे संख्या?
जिल्ह्यात अनेक शेतात शेततळे निर्माण झाले असून, फिश फार्मिंग वाढत आहे. पूर्वी त्यात रोहू, कटला, सिल्व्हर, लालपरी, कोंबडा, मरळ, मिरगल, पंकज यांसारखे मासे वाढवले जात होते. या माशांची वाढ उशिरा होते. चिलापी मासे लवकर वाढतात आणि प्रतिकूल परिस्थितीतदेखील तग धरून असतात तसेच यांची प्रजनन क्षमतादेखील असामान्य असल्याने सध्या फार्मिंगसाठी हा मासा मोठ्या प्रमाणात लोकप्रिय होत आहे. वाघूर धरणात फिश फार्मिंगचा मोठा प्रकल्प आहे. वाघूर धरणातदेखील हे मासे आढळून येत आहेत.
जलाशयातील जैवविविधता मोठ्या प्रमाणात नष्ट करणारा मासा
चिलापी मासा नदीतील व जलाशयातील स्थानिक जैवविविधता मोठ्या प्रमाणात नष्ट करतो. लहान मासे, त्यांची अंडी, झिंगे, पाणकीटक, लहानमोठे जलचर, बेडकांचे डिंभ, ड्रॅगन फ्लाय, डेमसेल फ्लायची अंडी, लार्वे, पाण वनस्पती असे जे मिळेल ते सर्व काही खादाडाप्रमाणे खाऊन मोठ्या संख्येत प्रजनन करत असल्याने अनेक ठिकाणी या माशांना डुक्कर मासा म्हटले जात असल्याची माहिती वन्यजीव संरक्षण संस्थेचे मत्स्य अभ्यासक गौरव शिंदे यांनी ‘लोकमत’ला दिली.
तिलापिया माशाची वैशिष्ट्य
१. हा मासा पर्सिफॉर्मीस गणाच्या सिचलिडी कुलातील एक मासा असून, याचे शास्त्रीय नाव ओरिओक्रोमिस मोझाम्बिका असून, पूर्वी तो तिलापी मोझाम्बिका असा ओळखला जाई. तो मूळचा दक्षिण आफ्रिकेतील असून, १९५२ मध्ये तमिळनाडू राज्यातील सेंट्रल मरीन फिशरी रिसर्च स्टेशन, मंडपम् या संस्थेत मत्स्यशेतीसाठी आणण्यात आला.
२. त्यानंतर त्याचा अन्य राज्यांत मत्स्यशेतीसाठी प्रसार करण्यात आला. तो मूळचा खाऱ्या पाण्यातील मासा आहे. परंतु तो मचूळ आणि गोड्या पाण्यातही वाढू शकतो. जलद होणारी वाढ आणि कोणत्याही अधिवासात टिकून राहण्याची अत्युच्य क्षमता हे तिलापी माशाचे विशेष गुणधर्म आहेत.
३. तिलापी माशाचे शरीर किंचित चपटे असून, रंग फिकट हिरवा किंवा काळसर असतो. पृष्ठपर लांब असून, त्याच्या पुढच्या भागावर काटे असतात. पृष्ठपर आणि पुच्छपरांच्या कडा पिवळसर असतात. प्रौढ तिलापी मासा सु. ३६ सेंमी.पर्यंत लांब असून, वजन सु. १.१ कि.ग्रॅ. असते. शरीरावर कंकनाभ (टेनॉइड) खवले असतात; परंतु पृष्ठपर आणि गुदपर यांच्या बुडाशी खवले नसतात. शैवाल, वनस्पतींचे छोटे तुकडे, डायाटम, कीटक आणि कवचधारी संधिपादांचे डिंभ हे या माशाचे अन्न आहे.
४. तिलापी मासा पर्यावरणातील सामान्य बदल सहन करू शकतो. तो गढूळ पाण्यात, कमी ऑॅक्सिजन असलेल्या, मचूळ किंवा खाऱ्या पाण्यातही राहू शकतो आणि वाढू शकतो. त्याच्या या वैशिष्ट्यामुळे जलाशयातील किंवा पाझर तलावातील मत्स्यशेतीसाठी वापरला जातो.
कोट..
तिलापियामुळे जलाशयातील सर्वच जैविकविविधता धोक्यात येत असली तरी खालील मस्य प्रजातींना अधिक धोका पोहचत आहे. एका तळ्यात तिलापी प्रजातीचे बारा-चौदा मासे सोडल्यावर एक-दीड महिन्यात त्यांची संख्या तीन हजार बनली, तर अडीच महिन्यांमध्ये ती १४ हजारांवर पोहोचली. त्याची संख्या वाढली की अर्थातच इतर माशांच्या संख्येवर विपरीत परिणाम होतोच. या माशांच्या शेतीवर बंदी आणायला हवी.
- बाळकृष्ण देवरे , वन्यजीव संरक्षण संस्था
सध्या नद्यांमधील पाणी आटले असून, काही ठिकाणी डबकी शिल्लक आहेत. आम्ही गेल्या काही दिवसांपासून या डबक्यांचे निरीक्षण करत आहोत प्रदूषित पाण्यात ऑक्सिजनचे प्रमाण खूप कमी आहे इतर अनेक जलचर नष्ट झाले आहेत ऑक्सिजनअभावी इथे इतर स्थानिक मासे तग धरू शकत नाही तिथे तिलापिया प्रजनन करत आहे. आणि त्यांची पिले वाढत आहेत. प्रदूषित पाण्यात वाढणारे जलचर, गाळातील झिंगे हे त्यांचे खाद्य आहे.
- रवींद्र फालक, अध्यक्ष, वन्यजीव संरक्षण संस्था