जळगाव : ग.स. सोसायटीच्या १४ संचालकांनी राजीनामे दिल्याने संचालक मंडळ बरखास्त करून संस्थेवर प्रशासक नियुक्त करण्यात यावा, अशी मागणी सहकार गटाने जिल्हा उपनिबंधकांकडे केली आहे. दरम्यान, प्रगती गटानेही जिल्हा उपनिबंधकांकडे तक्रार करीत अध्यक्ष मनोज पाटील यांना २००६ नंतर तिसरे अपत्य झाल्याने त्यांना अपात्र करण्यात यावे, अशी मागणी केली आहे.
यासंदर्भात सहकार गटाने जिल्हा उपनिबंधकांकडे दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, २१ पैकी १४ संचालकांनी राजीनामे दिले असून, यामुळे संचालक मंडळ सभेसाठी गणपूर्ती होऊ शकत नाही. परिणामी कामकाजही होऊ शकत नाही. त्यामुळे सोसायटीच्या व्यवस्थापनामध्ये कामकाज बंद पडण्याची अवस्था तयार झाली आहे. ही बाब लक्षात घेता संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासकाची नियुक्ती करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
अर्जावर उदय पाटील, विलास नेरकर, तुकाराम बोरोले, सुनील पाटील, अजबसिंग पाटील, कैलासनाथ चव्हाण, महेश पाटील, देवेंद्र पाटील, सुनील निंबा पाटील, विश्वासराव सूर्यवंशी, विद्यादेवी पाटील, विक्रमादित्य पाटील, भाईदास पाटील, रागिणी चव्हाण यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
ग.स. सोसायटीचे अध्यक्ष मनोज पाटील यांना तीन अपत्य असल्याची तक्रार प्रगती गटाच्या वतीने करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांना अपात्र करण्यात यावे अशी मागणी प्रगती गटाचे रावसाहेब पाटील व योगेश सनेर यांनी केली आहे.