लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : ग. स. सोसायटीची १११ वी सर्वसाधारण सभा बुधवारी ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी प्रशासक मंडळाचे प्राधिकृत मंडळ प्रमुख विजय गवळी हे होते. कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता ही सभा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली; मात्र या सभेत घरच्या ४० हजार सभासदांपैकी फक्त ३५ सभासदांना जॉईंन करून घेण्यात आले. या ३५ सभासदांनी सर्व विषयांना अनुमोदन आणि सूचना दिल्या. जे सभासद प्रयत्न करीत होते, त्यांना जॉईन करून घेतले नाही. म्हणून ही सर्वसाधारण सभा मॅनेज आहे, ही बेकायदेशीर ठरवावी अशी मागणी शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब मांगो पाटील आणि सरचिटणीस योगेश जगन्नाथ सनेर यांनी केली आहे.
ऑनलाइन पद्धतीने सभा असल्याने या सभेत ठराविकच सदस्यांना बोलण्याची संधी देण्यात आली. यामुळे इतर सभासदांनी प्रशासकीय मंडळाचा तीव्र शब्दात विरोध केला आहे. शिक्षक संघटनेने केलेल्या आरोपात म्हटले आहे की, नफ्यातून दरवर्षी तीन कोटी रुपये काढून मयत सभासद परिवारास अर्थसाह्य देणे, संपूर्ण कर्जमाफी देणे तसेच मागील वर्षी डीसीपीएस मयत धारकांसाठी विशेष अर्थसाह्य योजना, संपूर्ण कर्जमाफी देणे, व्याजदर कमी करणे याबाबत पोटनियमात दुरुस्ती सुचवायची होती. तसेच बोगस नोकरभरती बाबत लेखी अर्ज देऊनही प्रशासकांनी त्या विषयाला बगल देत मागील कार्यकारी मंडळाच्या बोगस कारभारावर पांघरून घातले असल्याचा आरोप शिक्षक संघटनेने केला आहे.
सभासदांच्या तोंडाला पाने पुसण्याचा घाट
शिक्षक भारती संघटनेचे जिल्हाध्यक्ष सोमनाथ पाटील यांनीही या सभेबाबत तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था कायदा १९६० नुसार वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना व कार्यक्रम पत्रिका १४ दिवस आधी सभासदाने नोंदवलेल्या पत्त्यावर पाठवली पाहिजे होती,परंतु २५ तारखेला अर्धवट सूचना प्रसिद्ध करुन ३१ला ऑनलाईन सभा घेणे हे अयोग्य आहे. जाणकार सभासदांना अहवाल अभ्यासून मते मांडण्यासही वाव दिला नाही. निदान सभेपूर्वी सभासदांपर्यंत अहवाल पोहोचला पाहिजे होता परंतु बहुसंख्य सभासदांना अहवालच मिळाला नाही. सभासद आयडी सभासदांना माहीत नाहीत. सगळीकडे जिल्ह्यात ३० मार्चपर्यंत लॉकडाऊन होते. लेखी मते मुख्य कार्यालय जळगाव येथे ३० मार्चपर्यंत कसे नोंदवावे हे अनाकलनीय होते. फक्त सभेचा फार्स होता. सभा ही सालबादसारखीच एकतर्फी झाली. सभेला नियोजन करून अनुमोदन देणाऱ्यांनाच बोलण्याची संधी दिली गेली आणि त्यांनी फक्त विषयास अनुमोदन दिले, खरे तर त्यांनी मयत सभासदांसाठी आर्थिक मदत तथा संपूर्ण कर्जमाफी ही मागणी तथा सभासद हिताचे निर्णय मांडण्याची नामी संधी घालविली. कर्मचारी हिताचे निर्णय झाले, परंतु सभासद हिताकडे दुर्लक्ष केले गेले अशा प्रकारे सभा घेणे म्हणजे सभासदांच्या तोंडाला पाने पुसली असल्याचा आरोप शिक्षक भारती संघटनेने केला आहे.
१८०० हून अधिक सभासद झाले सहभागी
सहकार गटाचे गटनेते उदय पाटील यांनी या सभेत १८०० हून अधिक सभासद सहभागी झाले असल्याचा दावा केला आहे. यासह लोकसहकार गटातील सदस्यांनी देखील या सभेत अनेक सभासदांनी सहभाग घेतल्याचाही दावा केला आहे; मात्र अधिकृत आकडा कोणत्याही संघटनेने दिलेला नाही.
कोट
ग.स. सर्वसाधारण सभेसाठी आम्हाला प्रयत्न करूनही संबंधितांनी जॉईन केले नाही. ही बाब न्यायिक नाही. शेवटी मॅनेज बैठक प्रशासकांनी पूर्ण केली. मात्र सभासद हितासाठी मागण्या मान्य झाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही.
- रावसाहेब मांगो पाटील व योगेश सनेर, प्रगती गट ग.स.सोसायटी, जळगाव