जळगाव : जागेच्या प्रश्नामुळे चिंचोली व्हाया जिल्हा रूग्णालय अशा विविध ठिकाणी फिरून अखेर शंभर बेडचे महिला व बालसंगोपन रूग्णालय जिल्हा रूग्णालयाच्या आवारातच होणार आहे़ डिपीडीसीच्या बैठकीत याबाबत ठराव मांडण्यात आला होता. आगामी महिनाभरात कामाला सुरूवात होण्याची शक्यता असून येत्या एक ते दीड वर्षात चार मजली इमारतीचे हे प्रशस्त रूग्णालय उभे राहण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे समजते़ यापूर्वी चिंचोलीला शिवारात होणारे हे रुग्णालय पालकमंत्री बदलताच आता शहरातच होणार आहे.गेल्या तीन ते चार वर्षांपासून पालकमंत्री गुलबाराव पाटील यांनी आरोग्य मंत्री दीपक सावंत यांच्या माध्यमातून या रूग्णालयासाठी पाठपुरवा केला होता. जून-जुलै २०१९ मध्ये या रूग्णालयाला राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत जिल्हा रूग्णालयाच्या आवारात मंजूरी मिळाली होती़ तीस कोटी रूपयांचा निधीही मंजुर झाला होता़ मध्यतंरी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून जागेचा प्रश्न उपस्थित करून हे रूग्णालय चिंचोली येथे वैद्यकीय संकुलाच्या ठिकाणी व्हावे, अशी मागणी झाली होती़ मात्र, हे रूग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून रूग्णालय हलवू नये, अशा मागणीचे पत्र जिल्हा शल्यचिकित्सक डॉ़ एऩ एस़ चव्हाण यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते़ दरम्यान, हे रूग्णालय चिंचोली येथे होण्याचा निर्णय आधीच वरिष्ठ पातळीवरून झालेला आहे, असा दावा अधिष्ठाता डॉ़ भास्कर खैरे यांनी केला आहे़काय असेल रूग्णालयात-प्रसुतीचे १३ रूम-प्रसुतीआधीच्या महिलांसाठी एएनसी वार्ड-प्रसूतीनंतर महिलांसाठी दोन ते तीन मोठे वार्ड-बालकांसाठी ४० ते ५० बेडचा नवजात शिशू काळजी कक्ष विभाग-ओपीडीसाठी रूम-चार शस्त्रक्रिया विभाग-कुपोषित बालकांच्या संगोपनासाठी स्वतंत्र कक्ष-चार सभागृह- यासह नव्याने डीईआसी हा कक्ष स्थापन करण्यात येणार आहे़ या कक्षात चार ते पाच तज्ज्ञ डॉक्टर बालकांच्या दूर्मिळ आजारांवर उदा़ ओठ दुभंगणे, हृदयाला छिद्र अशा प्रकारच्या आजारांवर उपचारासाठी हा कक्ष राहणार आहे़जिल्हा रूग्णालयात महिला रूग्णांचे हाल बघितले जात नाही, त्यामुळे महिला व बाल रूग्णालयासाठी मंत्रालयात वारंवार पाठपुरावा केला होता़ तीस कोटींचा निधी आलेला आहे, केवळ काम सुरू करायचे आहे़ शहराच्या मध्यवर्ती ठिकाणीच हे रूग्णालय सोयीचे असेल़-गुलाबराव पाटील, पालकमंत्री
पालकमंत्री बदलताच जागाही बदलली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2020 11:49 AM