फोटो
धरणगाव, जि. जळगाव : धरणगाव शहरात २० ते २२ दिवसांनी पाणीपुरवठा होत असल्याने भाजपा कार्यकर्त्यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना काळे झेंडे दाखविले. सोमवारी सायंकाळी हा प्रकार घडला. यावेळी भाजपा व शिवसेनेचे कार्यकर्ते आमने-सामने आल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना समजावले.
पालकमंत्री गुलाबराव पाटील हे संध्याकाळी गांधी उद्यानाच्या नूतनीकरणाच्या भूमिपूजनासाठी धरणगावात आले असता हा प्रकार घडला. आंदोलनात भाजपा ओबीसी आघाडीचे जिल्हाध्यक्ष ॲड. संजय महाजन, तालुकाध्यक्ष जिजाबराव पाटील आणि शहराध्यक्ष दिलीप महाजन आदी सहभागी झाले होते.
पालकमंत्री जिल्ह्याबाहेर पाण्याच्या विविध योजना जाहीर करतात. दुसरीकडे त्यांच्याच मतदार संघातील धरणगावात २० ते २२ दिवसापासून पाणीपुरवठा नाही. उन्हाळ्यात नागरिकांचे पाण्यासाठी हाल झाले. गावाचा पाणीपुरवठा तातडीने सुरुळीत न झाल्यास आता भाजप तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा त्यांनी दिला.
कोट
धरणगावच्या पाण्यासाठी आपण १३ कोटींचा निधी आणला आहे. पाण्यावरून राजकारण करणाऱ्यांना जनताच पाणी पाजल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या ताब्यातील शाळा व बँकांतील प्रकरणे बाहेर काढू.
- गुलाबराव पाटील, पालकमंत्री.