लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : राज्यात शिवसेना व भाजप नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात असताना, शुक्रवारी झालेल्या महासभेत शिवसेना नगरसेवकांनी महापौर भारती सोनवणे यांनी वर्षभरात केलेल्या कामांबद्दल त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. राज्यात शिवसेना व भाजपमध्ये विस्तव ही जात नसताना सेना नगरसेकांनी भाजपच्या महापौरांचा केलेल्या सत्कारावरून आता मनपातील विरोधी पक्ष असलेल्या शिवसेनेत खदखद वाढली आहे. या सत्काराबद्दल पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. तसेच संपर्कप्रमुख संजय सावंत यांनीही याबाबत नगरसेवकांना समज दिल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
मनपा निवडणुकीत शिवसेना व भाजप एकमेकांमध्येच लढत झाली. त्यातच विधानसभेच्या निवडणुकीत एकत्र लढवून देखील झालेल्या राजकीय घडामोडी व त्यानंतर राज्यात नव्याने निर्माण झालेले समीकरणे यावरून सध्यस्थितीत शिवसेना व भाजपमध्ये राजकीय युध्द रंगले आहे. त्यातच राज्यातील इतर महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी भाजप विरोधात शिवसेना, राष्ट्रवादी व कॉग्रेस अशी राजकीय समीकरण जुळत असताना जळगाव महापालिकेत विरोधी पक्ष असलेल्या शिवसेनेच्या नगरसेवकांनी भाजपच्या महापौर भारती सोनवणे यांचा महासभेत केलेल्या सत्कारावरून आता शिवसेनेतच नाराजीनाट्य सुरु झाले आहे. तसेच या सत्कारामुळे पक्षाबद्दलची भूमिका देखील बदलली जाईल अशीही भिती काही पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
पदाधिकाऱ्यांची परवानगी तरी घ्यावी
शिवसेनेच्या माजी नगरसेवकाच्या पत्नीचे निधन झाले आहे. त्यांच्या दारावर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी शनिवारी भेट दिली. यावेळी शिवसेनेचे मनपातील व पक्षाचे काही पदाधिकारी देखील उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री गुलबराव पाटील यांनी संबधित पदाधिकाऱ्यांकडे महासभेत झालेल्या महापौरांच्या सत्काराच्या कार्यक्रमाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. एकीकडे विरोध असताना दुसरीकडे अशाप्रकारचे कार्यक्रम पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना न विचारताच करणे चुकीचे असल्याचे यावेळी पालकमंत्र्यांनी सांगितले असल्याचीही माहिती सुत्रांनी दिली आहे.
संपर्कप्रमुखांनी दिलेल्या सूचनांकडे दुर्लक्ष
तीन महिन्यांपुर्वी संपर्कप्रमुख संजय सावंत हे शहराच्या दौऱ्यावर असताना शहरात व जिल्ह्यात शिवसेनेकडून करण्यात येणारे कोणतेही कार्यक्रम, आंदोलन व काढण्यात येणारे मोर्चे याबाबत जिल्हाध्यक्ष व महानगरप्रमुखांना पुर्वसूचना द्यावी त्यानंतरच उपक्रम राबवावेत अशा सूचना संपर्कप्रमुखांनी दिल्या होत्या. मात्र, शुक्रवारी महासभेत शिवसेनेचे गटनेते अनंत जोशी व नगरसेवक प्रशांत नाईक यांनी महापौरांचा अचानक केलेल्या सत्काराबद्दल संपर्कप्रमुखांनीही नाराजी व्यक्त केली आहे. यासह पक्षातील काही नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी देखील याबाबत नाराजी व्यक्त केली असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. या संदर्भात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
कोट...
शुक्रवारी महासभेत झालेल्या प्रकाराबद्दल संबधित नगरसेवकांना समज दिली आहे. शनिवारी नगरसेवकांच्या झालेल्या बैठकीत याबाबत सर्व काही सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच पुढे पदाधिकाऱ्यांना याबाबत विचारूनच निर्णय होतील.
-संजय सावंत, संपर्कप्रमुख, शिवसेना