लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी गेल्या दीड वर्षात बैठका घेण्याशिवाय कुठलेही ठोस काम केले नाही. असे असताना त्यांनी भाजपाचे माजी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर केलेले आरोप म्हणजे ‘नाचता येईना अंगण वाकडे’ असा प्रकार असल्याचा पलटवार भाजपचे महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांनी सोमवारी भाजप कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत केला आहे.
भाजपचे जिल्हा कार्यालय वसंत स्मृती येथे सोमवारी झालेल्या या पत्रकार परिषदेत दीपक सूर्यवंशी यांच्यासोबत भाजप मनपा गटनेते भगत बालाणी, स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे पाटील, ज्येष्ठ नगरसेवक कैलास सोनवणे, विशाल त्रिपाठी व मनोज भांडारकर उपस्थित होते. रविवारी शिवसेना उपनेते तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पत्रकार परिषदेत माजी पालकमंत्री गिरीश महाजन यांनी त्यांच्या काळात कुठलेही कामे न करता जळगाव शहराची वाट लावल्याचा आरोप केला होता. त्यावरून आज भाजप पदाधिकऱ्यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर टीका केली. तसेच त्यांनी महापालिकेला भाजपच्या काळात मिळालेल्या १०० कोटींच्या निधीवरील स्थगिती उठवून दाखवावी, असे आव्हान दिले.
पालकमंत्र्यांनी बैठका घेण्याशिवाय दुसरे काय काम केले ?
यावेळी भाजप पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, महापालिकेत व राज्यात भाजपची सत्ता असताना तत्कालीन मंत्री गिरीश महाजन यांनी जळगाव महापालिकेवरील सुमारे ४५० कोटींच्या कर्जाचा प्रश्न मार्गी लावून पालिका कर्जमुक्त केली. तत्कालीन मुख्यमंत्री यांच्याकडून २५ कोटी त्यानंतर महापालिकेत भाजपची सत्ता येताच १०० कोटींचा निधी आणला. त्यातील ४१ कोटींच्या कामांच्या निविदाही निघाल्यात. मात्र, राज्यात शिवसेनेने सत्ता येताच या निधीला स्थगिती दिल्याने विकास खुटल्याचा आरोपदेखील भाजप पदाधिकाऱ्यांनी केला. कोरोना काळात काम करण्याची संधी असताना गुलाबराव पाटील यांनी केवळ बैठका घेण्याशिवाय दुसरे काय केले ? असा सवालदेखील भाजप पदाधिकाऱ्यांनी केला. शहराच्या विकासासाठी गुलाबराव पाटील यांनी त्यांच्याच सरकारने ४१ कोटींच्या कामाला जी स्थगिती दिली आहे, ती सात दिवसांत उठवून दाखवावी तसेच ५८ कोटींच्या प्रस्तावांना मंजुरी आणावी व आणखी १०० कोटींचा निधी शासनाकडून आणून दाखवावा, असे आव्हानदेखील यावेळी भाजप पदाधिकाऱ्यांनी दिले.