दिव्यांग बांधवांना इलेक्ट्रिक पांढऱ्या काठीचे वाटप
जळगाव : नॅशनल असोसिएशन फॉर दी ब्लाइंडतर्फे शहरातील ६५ दिव्यांग बांधवांना नुकताच किराणा माल व इलेक्ट्रिक पांढऱ्या काठीचे वाटप करण्यात आले. यावेळी जळगाव पीपल्स बँकेचे चेअरमन अनिकेत पाटील, ब्लाइंड असोसिएशनचे अध्यक्ष भालचंद्र पाटील यासह सी.डी. पाटील, जी.आर. चौधरी, शुभश्री दप्तरी, उल्हास भोळे, संजय खंबायत, राजेंद्र खोरखेडे, जयंत सरोदे उपस्थित होते.
हावडा एक्स्प्रेस शनिवारपासून नियमित
जळगाव : यास चक्रीवादळामुळे गेले चार दिवस रद्द करण्यात आलेली (०२८०९-१०) हावडा एक्स्प्रेस शनिवारपासून नियमित करण्यात आली आहे. रेल्वे प्रशासनातर्फे या गाडीचे आरक्षण सुरू करण्यात आले असून, ही गाडी पूर्वीच्याच वेळापत्रकानुसार धावणार आहे. अशी माहिती भुसावळ रेल्वे प्रशासनातर्फे देण्यात आली.
अनाथ महिला रात्र निवारा केंद्रात दाखल
जळगाव : शहरातील पोदार स्कूलजवळ गेल्या आठवडाभरापासून राहणाऱ्या एका अनाथ महिलेला रात्र निवारा केंद्रातील कर्मचाऱ्यांनी नुकतेच रात्र निवारा केंद्रात दाखल केले आहे. ही महिला कुठली आहेे, याबाबत काहीच माहिती नसून, ती महिला अनाथ असल्याचे रात्र निवारा केंद्राच्या व्यवस्थापिका मनीषा पारधी व काळजी मनोज कुलकर्णी यांनी सांगितले. दरम्यान, याठिकाणी दाखल करण्यापूर्वी या महिलेची कोरोना चाचणीही करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले.
आर्थिक व्यवहारासाठी बँकांनी वेळ वाढविण्याची मागणी
जळगाव : सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बँकांतर्फे ग्राहकांना त्यांच्या आर्थिक व्यवहारासाठी सकाळी १० ते दुपारी २ ही वेळ निश्चित करण्यात आली आहे. मात्र, या वेळेत होणाऱ्या गर्दीमुळे अनेक ग्राहकांना त्यांचे आर्थिक व्यवहार पूर्ण करता येत नाहीत. त्यामुळे त्यांना पुन्हा दुसऱ्या दिवशी यावे लागते. तरी बँकांनी त्यांची ग्राहकांच्या आर्थिक व्यवहारासाठी वेळ वाढविण्याची मागणी ग्राहकांमधून केली जात आहे.