जळगाव : तोक्ते चक्रीवादळामुळे गुजरातप्रमाणे महाराष्ट्रात देखील मोठे नुकसान झाले. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फक्त गुजरातला मदत केली. यावरून राज्यात सत्ताधारी विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. ज्याप्रमाणे गुजरातला मदत केली तशी महाराष्ट्रालाही मदत केली पाहिजे होती, असे मत सार्वजनिक पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केले.
गुलाबराव पाटील हे शनिवारी दुपारी जळगावात अजिंठा शासकीय विश्रामगृहात कार्यकर्त्यांच्या भेटी-गाठी घेतल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी ही टीका केली.
आमदारांच्या नियुक्तीला महत्त्व हवे
राज्यपाल नियुक्त आमदारांच्या रखडलेल्या नियुक्तीबाबत न्यायालयाने राज्यपालांच्या मुख्य सचिवांना विचारणा केली असून त्याचे उत्तर दोन आठवड्यात मागितले आहे. आता ते न्यायालयाला काय उत्तर देतात, याची उत्सुकता आहे. राज्यपाल नियुक्त आमदार करणे ही काही आजची गोष्ट नाही. ही बाब परंपरागत सुरू आहे. आमदार मग तो विधानसभेचा असो किंवा विधानपरिषदेचा, प्रत्येकाच्या डोक्यात राज्याला सूचना देण्याच्या बाबतीत वेगवेगळ्या प्रकारची कल्पना असते. त्यामुळे आमदारांच्या नियुक्तीला महत्त्व दिले पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कोकणात पाहणी दौरा केला. त्यामुळे त्यांनी गुजरातप्रमाणे महाराष्ट्राला पण मदतीसाठी प्रयत्न करावेत, असा टोला गुलाबराव पाटील यांनी फडणवीसांना लगावला.