लग्नमंडपातच पहाटेच्या शपथविधीचा मुद्दा, गुलाबरावांच्या भाषणानं हशा पिकला

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2023 01:16 PM2023-03-15T13:16:16+5:302023-03-15T13:19:45+5:30

गुलाबराव पाटील मंगळवारी जळगाव जिल्ह्यातील त्यांच्या मतदार संघात एका लग्नसोहळ्यात वधू वरांना आशीर्वाद देण्यासाठी गेले होते

Gula Rao's speech on the subject of taking vows in the morning in the wedding hall raised laughter | लग्नमंडपातच पहाटेच्या शपथविधीचा मुद्दा, गुलाबरावांच्या भाषणानं हशा पिकला

लग्नमंडपातच पहाटेच्या शपथविधीचा मुद्दा, गुलाबरावांच्या भाषणानं हशा पिकला

googlenewsNext

जळगाव - शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे मंत्री गुलाबराव पाटील हे आपल्या खुमासदार आणि ग्रामीण बाजातील भाषणामुळे नेहमीच चर्चेत असतात. तसेच, बिनधास्तपणे भूमिका मांडत ते आपला वेगळेपणाही जपतात. कधी भाषणातील शेरोशायरीमुळे, कधी स्टेजवर कव्वाली गायल्यामुळे तर कधी मिश्कील टोले लगावल्यानेही गुलाबराव पाटील महाराष्ट्राला आता परिचीत झाले आहेत. शिंदे गटाची बाजू मांडतानाही ते विरोधकांना जशात तसे प्रत्युत्तर देतात. काही दिवसांपूर्वीच त्यांचं सभागृहातील भाषण गाजलं होतं. जेथे त्यांनी नागालँडमधील पाठिंब्यावरुन राष्ट्रवादीला लक्ष्य केलं होतं. आता, पुन्हा एकदा त्यांनी पवार नावाला धरुन मजेशीर फटकेबाजी केली. 

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी भाजपसोबत एकत्र येत भल्या सकाळी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. पहाटेचा शपथविधी म्हणून हा सोहळा सर्वत्र गाजला, हे सरकार दीड दिवसांत कोसळलं पण, अजित पवारांना नेहमीच या प्रश्नाला सामोरं जावं लागतं. तर, अनेक कार्यक्रमात किंवा सार्वजनिक व्यासपीठावर याची चर्चा होते. गुलाबराव पाटील मंगळवारी जळगाव जिल्ह्यातील त्यांच्या मतदार संघात एका लग्नसोहळ्यात वधू वरांना आशीर्वाद देण्यासाठी गेले होते. त्यावेळी, त्यांनी नवविवाहितांचं अभिनंदन करताना शुभेच्छापर भाषण केलं अन् उपस्थितांना हसवलं. वधू ही पवार नाव असलेल्या कुटुंबातील असल्याने गुलाबराव पाटील यांनी शुभेच्छापर भाषणात राजकीय फटेबाजी करत लग्नमंडपात हशा पिकवला. 

मुलगी पवार कुटुंबातून येते, आम्ही पवारांना घाबरुनच असतो. कारण तुम्ही सकाळी-सकाळी शपथ घेता आणि काय करुन टाकता ते आम्हाला माहिती नाही. त्यामुळे पवारांना कायम बरोबर ठेवावे लागते. कारण पवारांची बुद्धी चालते तशी कोणाचीही चालत नाही, असे गुलाबराव यांनी म्हटले. पाटील यांच्या या वक्तव्यानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. त्यानंतर, हा लग्नसोहळा कोणत्याही पक्षाचा नाही, व्यक्तीचा आहे, माणूसकीचा हा सोहळा आहे. विनोदाचा भाग सोडून द्या असे म्हणत नववधु आणि वरास शुभेच्छा देत मनोगत संपवले. सध्या सोशल मीडियावर मंत्री पाटील यांचा हा व्हिडिओही चांगलाच व्हायरल झाला आहे. विनोदी शैलीतून हा व्हिडिओ असल्याने नेटीझन्स व्हिडिओ पाहून आनंद घेत आहेत. 

Web Title: Gula Rao's speech on the subject of taking vows in the morning in the wedding hall raised laughter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.