जळगाव : येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाजप मंत्र्यांच्या चौकशीचे अहवाल महाविकास आघाडी सरकार उघड करणार असल्याच्या वृत्ताला राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगावात दुजोरा दिला असून ‘मागील काळात ज्या काही चुकीच्या गोष्टी घडल्या आहेत, त्या उघड होतीलच’, अशा शब्दात त्यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाजपला घेरण्यासाठी आखल्या जाणाऱ्या रणनितीचे संकेत दिले.दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कोकण दौºयाच्या पार्श्वभूमीवर नाणार प्रकल्पावरून त्यांच्यावर टीका करणारे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचाही पाटील यांनी समाचार घेत राणे यांना टीका करण्याशिवाय काय येते व टीकेशिवाय त्यांचे अस्तित्व कसे टिकू शकेल, असा चिमटाही त्यांनी राणे यांना काढला.शिवजयंती निमित्त जळगावात बुधवारी सायंकाळी मिरवणूक काढण्यात आली, या मिरवणुकीला हजेरी लावल्यानंतर गुलाबराव पाटील पत्रकारांशी बोलत होते. त्या वेळी त्यांनी हे संकेत दिले.येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात महाविकास आघाडी सरकार भाजप मंत्र्यांच्या चौकशीचे अहवाल उघड करणार असल्याची चर्चा आहे. याबाबत गुलाबराव पाटील यांना विचारणा केली असता त्यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला. ते म्हणाले की, ‘मागील काळात ज्या काही चुकीच्या गोष्टी घडल्या आहेत, त्या उघड होतीलच. त्यात कुणी भीती बाळगण्याचे कारण नाही. जे चांगले असेल ते चांगलेच असेल. मात्र जे उघड करण्यासारखे असेल ते उघड करावेच लागेल. ज्या गोष्टी खºया आहेत, त्या जनतेसमोर आणाव्याच लागतात, असे स्पष्टपणे सांगितले.टीका केली नाही तर राणेंचे अस्तित्व कसे टिकेल?मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सध्या कोकण दौºयावर आहे. त्या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर ‘नाणार’ प्रकल्पाबाबत वक्तव्य करीत मुख्यमंत्र्यांवर टीका केली. मुख्यमंत्री ठाकरे यांचे कोकणच्या विकासात काय योगदान आहे? असा प्रश्न नारायण राणे यांनी केला होता. तसेच हे राज्य अधोगतीकडे जात आहे, सरकार चालत नसून भ्रष्टाचाराची दुकाने सुरु आहेत आणि यात मुख्यमंत्री कार्यालयाचाही समावेश आहे, अशीही टीका राणे यांनी केली होती. या टीकेला गुलाबराव पाटील यांनी प्रत्युत्तर देत टीका करणे हेच नारायण राणे यांचे काम आहे. त्याशिवाय दुसरे त्यांना येत नाही, असे गुलाबराव पाटील यावेळी म्हणाले. टीका केली नाही तर त्यांचे अस्तित्त्वच राहू शकत नाही, असे सांगत पाटील यांनी राणे यांना चिमटा काढला.
भाजप मंत्र्यांच्या चौकशीचे अहवाल महाविकास आघाडी सरकार उघड करणार - गुलाबराव पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2020 12:11 PM