यावल, जि.जळगाव : दहशतवादविरोधी पथकाने साकळी, ता.यावल येथील दोन युवकांना ताब्यात घेतल्याने हे गाव राज्यभरात चर्चेत आले आहे. एकीकडे कारवाई होत असताना दुसरीकडे गाव सुन्न तसेच भयभीतही झाल्याचा अनुभव या गावात फेरफटका मारला असता दिसून आले.यावल तालुक्याच्या पश्चिम भागातील सुमारे १० हजार लोकसंख्या असलेले साकळी गाव राजकीय घडामोडींसह, शैक्षणिक, शेती आणि व्यापारीदृष्ट्या तालुक्यात आघाडीवर आहे. हिंदू- मुस्लीम धर्मातील इतर जातींसह बारा बलुतेदारांचीही संख्या येथे बऱ्यापैकी बाहे. गेल्या काही दिवसात घडलेल्या अप्रिय घटनेने साकळी गावाकडे प्रशासन संवेदनशील गाव म्हणून पाहत आहे. त्यात भर पडली ती गेल्या दोन दिवसात दहशतवादविरोधी पथकाने केलेल्या कारवाईची. एटीएसच्या पथकाने गावातील दोन युवकांच्या घरी छापे टाकत त्यांच्या घरांची झडती घेत त्या दोन युवकांना ताब्यात घेतले. यामुळे साकळी गाव जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात चर्चेत आले आहे. इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांसह साकळीचे वृत्त राज्यभर झळकल्याने संपूर्ण गाव सुन्न झाले आहे. बरं ही कारवाई सलग दोन दिवस झाल्याने आता एटीएसच्या नजरेत अजून गावातील तिसरा तर कोणी नाही ना, या भीतीनेही गाव भयभित आहे. विशेष म्हणजे त्या युवकांना एटीएसने कोणत्या गुन्ह्यात या संशयिताना ताब्यात घेतले, त्यांना कोठे नेले हे कोणासही माहीत नाही. यामुळे ग्रामस्थांमध्ये विविध चर्चा ऐकावयास मिळत आहे.मूळ कर्की, ता.मुक्ताईनगर येथील व गेल्या १५-२० वर्षांपासून साकळी येथे रहिवासास असलेला २८ वर्षीय वासुदेव भगवान सूर्यवंशी या आॅटो गॅरेज चालकास दहशतवादविरोधी (एटीएस) च्या पथकाने गुरुवारी दुपारी अचानकपणे ताब्यात घेतले. त्यांच्या घराची सुमारे तीन तास झडती घेत त्याला अज्ञातस्थळी हलवले. कोणताही अधिकृत खुलासा केला नसताना गावासह तालुक्यात मात्र कोणी डॉ.नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरण, तर कोणी ना-सोपारा बॉम्ब हत्याकांड तर कोणी सनातन कार्यकर्ता अशा विविध घटनांशी त्याचा संबंध असल्याची चर्चा आपापल्यापरीने करीत आहेत. या चर्चेला पूर्णविराम मिळत नाही तोच दुसºया दिवशी म्हणजे शुक्रवारी सायंकाळी पुन्हा एटीएसचे पथक गावात दाखल होत लोधी वाड्यातून विजय उर्फ भैय्या उखासिंग लोधी या तरुणास ताब्यात घेऊन त्याच्या घराची झाडाझडती केली. पथकाने वासुदेव सूर्यवंशी व विजय लोधी या दोघांच्या घरांची झडती घेतली. त्यात त्यांना काय आक्षेपार्ह साहित्य मिळाले याचा खुलासा पथकाने केला नाही, तर स्थानिक पोलीसही यापासून अनभिज्ञ आहेत. या दोघांना नेमक्या कोणत्या गुन्ह्यात ताब्यात घेतले हे प्रश्न अनुत्तरीत आहे. परिणामी ज्याच्या-त्याच्या परीने वेगवेगळ्या घटनांशी त्यांचा संब्ांध जोडत आहेत. वासुदेव व विजय हे दोघं मित्र असल्याची गावात चर्चा आहे. यासह अजूनही कोणी त्यांचे मित्र असतील तर तिसºया मित्रावरही कारवाई होणार का, अशाही चर्चा रंगू लागली आहे. वासुदेव भगवान सूसूर्यवंशी यांचे वडील लहानपणीच वारल्याने त्यांच्या आईसह ते मामाच्या गावी म्हणजे साकळी येथे वास्तव्यास आहेत.गेल्या १५-२० वर्षांपासून स्वत:च्या घरात आईसह वास्तव्य करत आहेत. वासुदेव महादेवभक्त आहेत. दररोज न चुकता महादेव मंदिरात जाणे यासह तो धार्मिक असल्याचे ग्रामस्थ सांगतात. घराजवळच मुख्य रस्त्यावर टपरी वजा वासुदेवचे दुचाकी दुरूस्तीचे गॅरेज आहे. कधीही कोणत्या भानगडीत न पडलेल्या वासुदेववर एटीएसच्या या कारवाईने संपूर्ण गाव अचंबित झाले आहे. दुसरा मित्र विजय उर्फ भैय्या याचासुद्धा कटलरीचा व्यवसाय असून, तो कापसाचा व्यापारी असल्याचे सांगितले जात आहे.
सलग कारवाईने गाव सुन्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 08, 2018 6:29 PM