संजय पाटीलअमळनेर, जि.जळगाव : विनावेतन काम करून ज्ञानदान करणाºया शिक्षकाला गुरुदक्षिणा म्हणून हाती झोळी घेऊन भीक मागणाºया एकलव्यांना भिकाºयानेच दान करून माणुसकी विसरत चाललेल्या समाजाला चांगलेच अंजन घातले आहे.मारवड येथील विद्यालयात विना अनुदान तत्वावर गेल्या आठ वर्षांपासून विनावेतन काम करत असलेल्या करणखेडा येथील किशोर निंबा पाटील या शिक्षकाला गंभीर आजाराने ग्रासले आहे. दोन्ही किडण्या खराब झाल्या आहेत. त्यांच्या उपचारासाठी तब्बल सात लाख रुपये लागणार आहेत. शिक्षक संघटनासह अधिकारी, समाजसेवकांचे मदतीचे हात पुढे सरसावले. मात्र खर्च मोठा असल्याने जमा झालेली पुंजी अपूर्ण पडत असल्याचे लक्षात आल्यावर ज्ञानदान करणाºया आपल्या गुरूला न मागता गुरुदक्षिणा देण्यासाठी आधुनिक एकलव्य पुढे आले. रुचिता चौधरी नावाच्या विद्यार्थिनीने आपल्या आजी-माजी सहकारी विद्यार्थ्यांसोबत हातात झोळी घेऊन भीक मागण्याचा निर्णय घेतला आणि अमळनेर शहरातून गुरूच्या आरोग्यासाठी भीक मागितली. द्रोणाचार्यांना आपल्या हाताचा अंगठा गुरुदक्षिणा म्हणून कापून देणाºया एकलव्याने तत्कालीन गुरूंना आणि विद्यार्थ्यांना लाजवले होते. मात्र त्या एकलव्याला साजेसे असे कार्य करून आधुनिक एकलव्यांनी आजच्या कृतघ्न आणि संस्कार विसरत चाललेल्या विद्यार्थ्यालाही लाजवून गुरू विद्यार्थी नात्याची मान पुन्हा अभिमानाने उंचावली आहे, मात्र त्याहीपेक्षा भयानक म्हणजे स्वत:च्या पोटासाठी दररोज भीक मागणाºया भिकाºयानेही किशोर पाटील यांच्या उपचारासाठी आहे तेवढी हातातील भीक मदत म्हणून झोळीत टाकून माणुसकीहीन होत चाललेल्या समाजाच्या डोळ्यात अंजन घातले आहे. यासाठी वैभव शिंसोदे, चेतन शिंदे यांच्यासह आजी-माजी विद्यार्थी भीक मागत होते.
आधुनिक एकलव्याने भीक मागून दिली गुरुदक्षिणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 08, 2018 4:56 PM