जळगाव : नवीन कपडे, ट्रॅक सूट खरेदी करून मौजमस्ती करणे आणि गुटखा विक्रेत्याला ॲडव्हान्समध्ये पैसे दिले अन् तेथेच संशय बळावला. हाच धागा पकडून पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. प्रेम प्रकाश कोळी (२०,रा.बोदवड) हा चोरटा जाळ्यात अडकला. बोदवड येथे अमित बालकिसन चांडक यांच्याकडे घरफोडी करून १ लाख ५५ हजार रुपये रोख व सहा हजार रुपये किमतीचे चांदीचे दागिने लांबविल्याचे उघड झाले. प्रेम याने गुन्ह्याची कबुली देतानाच तपासात अनेक धक्कादायक बाबी सांगितल्या.
बोदवड येथे ११ ऑक्टोबर रोजी अमित बालकिसन चांडक यांच्या राहत्या घरातून १ लाख ५५ हजार रुपये रोख व सहा हजार रुपये किमतीचे चांदीचे दागिने घरफोडी करून लांबविले होते. याप्रकरणी बोदवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. या घरफोडीत प्रेम प्रकाश कोळी (रा.बोदवड) याला स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले, सहायक फौजदार अशोक महाजन, दीपक पाटील, नरेंद्र वारुळे, किरण धनगर, प्रमोद लाडवंजारी व मुरलीधर बारी यांच्या पथकाने रविवारी अटक केली. या पथकाने त्याची आस्थेवाईक चौकशी केली असता, त्याने सांगितलेली माहिती ऐकून पोलीस चक्रावले.
दोनशे रुपये रोजाने कामाला
अमित चांडक यांचे मिरची कांडप यंत्र आहे. प्रेम हा चांडक यांच्याकडे आठवड्यातून दोन ते तीन दिवस कामाला येत होता. त्यासाठी त्याला प्रति दिवस दोनशे रुपये मोबादला मिळत होता. चांडक यांचे उत्पन्न किती, पैशाची आवक कशी आहे व पैसे कुठे ठेवतात, याची संपूर्ण कल्पना प्रेम याला होती. किंबहूना मालकानेही त्याच्यावर विश्वास ठेवला होता. ११ऑक्टोबर रोजी चांडक हे घराला कुलूप लावून पाचोरा येथे गेले असताना प्रेम याने हीच संधी साधली. घराच्या मागील दरवाजाचा कडी कोयंडा तोडला व घरातून १ लाख ५५ हजार रुपये रोख आणि चांदीचे दागिने खिशात घातले. याच वेळी घरात पाच लाखाच्यावर रोकड तसेच सोन्याचे दागिने होते; परंतु त्याला प्रेम याने हात लावला नाही. इतक्या पैशाची गरज नव्हती, जितके लागणार होते, तितकीच रक्कम चोरली अशी कबुली त्याने दिली. जास्त रक्कम असतानाही त्याचा त्याला मोह सुटला नाही.
आठवीपर्यंत शिक्षण, एकुलता मुलगा
प्रेम हा आई-वडिलांचा एकुलता मुलगा आहे. आई शेतात मजुरी तर वडील हॉटेलमध्ये भांडी घासण्याचे काम करतात. अत्यंत गरिबीची परिस्थिती असल्याने मौजमस्ती करता येत नव्हती. त्यासाठीच आपण चोरीचा मार्ग निवडला, असेही त्याने सांगितले. दरम्यान, याआधी त्याच्यावर एकही गुन्हा नाही. ही पहिलीच चोरी केली आणि नवीन कपडे खरेदी व गुटखा विक्रेत्याला ॲडव्हान्स पैसे देऊन ठेवल्यामुळे पकडला गेला. आठवीपर्यंतच त्याचे शिक्षण झाले. गुन्हा उघड झाल्यानंतर त्याने पाच हजार रुपये रोख व चांदीचे दागिने काढून दिले.