पाचोरा : कोरोनाचे निर्बंध शासनाने कडक केले असतानाही पाचोरा शहरात अत्यावश्यक सेवा समजून पानमसाल्याची दुकाने बिनदिक्कतपणे सुरू असून निर्बंध काळात छोट्या व्यावसायिकांवर कारवाईचा बडगा उगारला जातो. मात्र अशा अवैध धंद्यावर कारवाई केली जात नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
पाचोरा शहरात गुटखा विक्री सर्रासपणे होत असून अन्न व औषध प्रशासन कोणतीही कारवाई करीत नाही तर पोलीस प्रशासनाचे काम नसल्याने त्यांचेही दुर्लक्ष होत आहे. शहरात भडगाव रोडवरील पान मसाल्याची दुकाने, माँसाहेब जिजाऊ कॉम्प्लेक्स मधील पानमसाल्याची दुकाने बसस्टँड रोड सिंधी कॅम्प भागात गुटखा जोरात विक्री होत असून सर्वच पान टपऱ्यांवर गुटखा चढ्या भावात सहज मिळत असल्याने गुटखा बंदीचे फक्त हप्ते वसुलीसाठी नाटक असल्याचे दुकानदार बोलून दाखवतात.
या गुटखा विक्रीवर संबंधित यंत्रणेने धाडसत्र सुरू करून शहरातील गुटखा विक्री बंद करावी व अत्यावश्यक सेवा नसताना सुरू असलेल्या दुकानांवर कारवाई करावी, अशी मागणी शहरातून होत आहे.