जळगाव : अवकाळी पावसाने गुरुवारी जळगाव व धुळे जिल्ह्यातील विविध भागांत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. जळगाव जिल्ह्यातील एरंडोल व पाचोरा तालुक्यात गारपीट तर अन्य ठिकाणी झालेल्या वादळी पावसामुळे शेतकºयांचे नुकसान झाले आहे. धुळ्यातही काही वेळ पाऊस झाला. मात्र त्यानंतर दुपारी लख्ख सूर्यप्रकाश पडला.
पारोळा तालुक्यात भोंडण, चोरवड, बहादरपुर, उंदिरखेडा यासह परिसरात अवकाळी पावसाने दुपारी ४ वाजता अर्धा तास झोडपून काढले. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात विक्रीसाठी आणलेला मका ज्वारी या धान्याचे नुकसान झाले. भोंडण येथे बारीक गारा पडल्या.
उत्राण (एरंडोल) येथे दुपारी अचानक मेघगर्जनेसह पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर सुमारे २० मिनिटे मुसळधार पाऊस झाला तर १८ मिनिटे गारपीट झाली़ काही घरांचे पत्रे उडाले. पाऊस व गारपिटीमुळे लिंबू व पेरू आदी फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.धुळे जिल्ह्याला १५ ते २० मिनिटे वादळी वाºयासह झालेल्या पावसाने झोडपून काढले.
वादळामुळे अनेक भागातील विजेचे खांब वाकले, झाडाच्या फांद्या तुटल्या. तर बाजार समितीत आणलेल्या कांदा, मक्याचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. गुरुवारी दुपारी साडेबारा वाजेपासूनच ढगाळ वातावरण तयार होऊ लागले होते. अडीच वाजेच्या सुमारास वादळी पावसाला सुरुवात झाली. अवघे १५-१० मिनिटे झालेल्या या दमदार पावसामुळे सखल भागात पाणी साचले होते. नंदुरबार जिल्ह्यात मात्र दिवसभर सूर्यप्रकाश होता.