लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : दक्षिण-पूर्व अरबी समुद्रात निर्माण झालेल्या ‘तौक्ते’ चक्रीवादळामुळे रविवारी जळगाव शहरात दुपारपासून वादळी पावसाने हजेरी लावली. यावेळी वीज तारा तुटल्याने निम्मे शहर अंधारात होते. रात्री आठ वाजण्याच्या सुमारास वीज आली. मात्र, अवघ्या दहा तेे पंधरा मिनिटांत पुन्हा वीज पुरवठा खंडित झाला. तालुक्यातील गिरणा व तापी नदीच्या पट्ट्यात केळी बागांना वादळामुळे मोठा फटका बसला. वीज गायब झाल्याने त्यांचा फटका दूरसंचार यंत्रणेवर झाला. त्याचा फटका इंटरनेट सेवेला बसल्याने अनेक कामाचा खोळंबा झाला.
रविवारी दुपारी तीन वाजल्यापासून जळगाव शहर व तालुक्यात जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाचे आगमन झाले. त्यामुळे तालुक्यातील अनेक गावांसह शहरातील बहुतांश भागातील वीजपुरवठा खंडित झाला.
तापमानात मोठी घट
रविवारी दुपारी तीन वाजल्यानंतर झालेल्या पावसामुळे वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल झाला होता. दुपारी बारा वाजेपर्यंत शहराचा पारा ४२ अंशांवर कायम होता. मात्र, दुपारी चार वाजल्यानंतर तापमानात मोठी घट होऊन, पारा ३५ अंशांपर्यंत खाली आला होता. यामुळे काही प्रमाणात गारवा जाणवत होता. शहर व तालुका परिसरात दुपारी तीन वाजल्यानंतर २० किलोमीटर वेगाने वारे वाहत होते. वाऱ्याचा वेग जास्त असल्याने केळीच्या लवकर लागवड झालेल्या कांदे बागाला मोठे नुकसान झाले आहे. जळगाव तालुक्यातील कठोरा, भोकर, आव्हाने, खेडी, फुपनगरी, गाढाेदे, पळसोद या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ढगाळ वातावरण आणि जोरदार वारा येत आहे.
विद्युत तारा तुटल्याने वीजपुरवठा खंडित
दुपारी झालेल्या वादळी वाऱ्यामुळे जळगाव तालुक्यातील मुख्य फिडर वर तांत्रिक बिघाड झाल्यामुळे शिरसोली, म्हसावद, वावडदा या गावांमधील वीजपुरवठा रात्री अकरा वाजेपर्यंत खंडित झाला होता. तर आव्हाणे, खेडी परिसरातील विद्युत तारा तुटल्यामुळे या गावांमधील वीजपुरवठा खंडित झाला होता. तसेच रात्रभर विजेचा लपंडाव सुरू होता. तसेच जळगाव शहरातील अनेक भागांमधील वीजपुरवठा खंडित झाला होता. दरम्यान, वाघुर धरण परिसरातील मुख्य फिडरवरदेखील तांत्रिक बिघाड झाल्यामुळे काही तास वीज बंद झाली होती. दरम्यान, यामुळे शहराचा पाणीपुरवठ्यावरदेखील परिणाम होण्याची शक्यता आहे.
आरएमएस काॅलनीत झाड कोसळले
शहरातील नेहरू नगर, महाबळ, मोहननगर, आरएमएस काॅलनी, भवानी पेठ, जुने जळगाव, रिंग रोड यासह अन्य भागात वीजपुरवठा खंडित झाला होता. रात्री आठ वाजण्याच्या सुमारास वीजपुरवठा सुरळीत झाला. मात्र, अवघ्या १० ते १५ मिनिटांत पुन्हा वीजपुरवठा खंडित झाला. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत विजेचा लंपडाव सुरू होता. आरएमएस काॅलनीमध्ये विजेच्या खांबावर झाड कोसळल्याने या भागातील वीज पुरवठा खंडित झाला. नागरिकांनी याबाबत महावितरण विभागाच्या कर्मचाऱ्यांना माहिती दिल्यानंतर त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली.
वीजवाहिन्या व झाड कोसळले
शहरातील भजे गल्ली, भास्कर मार्केट परिसरात वीजवाहिन्या तुटल्या होत्या. तर चिमुकले राममंदिर, रिंगरोड, पिंप्राळा व हरिविठ्ठल नगर भागात झाडे व फांद्या तुटून वीज वाहिनीवर पडल्याने परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला होता.
वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांचे नंबर संपर्क क्षेत्राच्या बाहेर
शहरातील विविध भागातील वीज गायब झाल्यानंतर नागरिकांनी चौकशीसाठी टोल फ्री नंबर तसेच त्या भागातील वीज कंपनीचे अधिकारी व कर्मचारी यांच्याशी संपर्क सुरू केला. मात्र, काही वेळेनंतर हे नंबर संपर्क क्षेत्राच्या बाहेर आढळून आले.