लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : गेल्या आठवड्यात चक्रीवादळामुळे अनेक तास वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर, रविवारी पहाटे पुन्हा झालेल्या अवकाळी पाऊस आणि वाऱ्यामुळे शहराच्या निम्म्या भागातील वीज पुरवठा खंडित झाला. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी युद्धपातळीवर काम करून टप्प्या-टप्प्याने पाच ते सहा तासांनी वीज पुरवठा सुरळीत केला असल्याचे महावितरणतर्फे सांगण्यात आले.
रविवारी पहाटे पावसाने विजांच्या गडगडाटासह जळगाव शहर व परिसरात जोरदार हजेरी लावली. पावसासोबत जोरदार वाराही असल्यामुळे अनेक भागातले ब्रेक डाऊन होऊन वीज पुरवठा खंडित झाला. यामध्ये महाबळ, सुप्रिम कॉलनी, मेहरुण, अयोध्या नगर, पिंप्राळा, गणेश कॉलनी, शिवाजी नगर, जय नगर, नवीपेठ यासह शहराच्या इतर भागात वीज पुरवठा खंडित झाला होता. तसेच अनेक भागात पाऊस सुरू असताना अधून-मधून सातत्याने वीज पुरवठा खंडित होत होता.
इन्फो :
टप्प्या-टप्प्याने वीज पुरवठा सुरळीत
अवकाळी पाऊस व वाऱ्यामुळे एकाच वेळेस शहरातील अनेक भागात वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर, तत्काळ वीज पुरवठा सुरू करणे महावितरणला अशक्य होते. ब्रेक डाऊनमुळे अनेक भागातील वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर, जळगाव शहराचे प्रभारी कार्यकारी अभियंता एन. बी. चौधरी यांनी तत्काळ सर्व शाखा अभियंत्यांना वीज पुरवठा सुरळीत करण्याच्या सूचना केल्या. या पावसामुळे शहरात कुठेही विद्युत खांब किंवा विद्युत तारा कोसळण्याची घटना घडली नसली तरी, पाच ते सहा ठिकाणी ब्रेक डाऊन झाल्याचे प्रकार घडले. तर काही ठिकाणी इन्सुलेटर तुटून पडले. त्यामुळे वीज पुरवठा सुरू करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर अडचणींचा सामना करावा लागला. त्यामुळे टप्प्या-टप्प्याने शहरातील विविध भागातील वीज पुरवठा पाच ते सहा तासानंतर सुरळीत केल्याचे महावितरणतर्फे सांगण्यात आले.
इन्फो :
कमी दाबाने वीज पुरवठा
शहरातील जय नगरमध्ये पहाटे ४ वाजता वीज पुरवठा खंडित होऊन, सकाळी सात वीज पुरवठा सुरू झाला. मात्र, अत्यंत कमी दाबाने विजेचा प्रवाह असल्यामुळे घरातील इतर उपकरणे नागरिकांना बंद ठेवावी लागली. याबाबत काही नागरिकांनी स्थानिक महावितरणच्या कार्यालयात तक्रार करूनही सकाळी ११ पर्यंतही वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला नव्हता. तसेच कार्यालयातील फोनही घेण्यात येत नसल्याने, नागरिकांनी महावितरणच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली.