लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरात अनेक दिवसांनंतर रविवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास जोरदार पावसाने हजेरी लावली. सुमारे अर्धातास झालेल्या दमदार पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला. मात्र, मनपा प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे अर्धातासाच्या पावसातच शहरातील मुख्य रस्त्यांसह शहरातील गल्लीबोळातील गटारीदेखील ओव्हरफ्लो झाल्यामुळे गटारीचे पाणी थेट रस्त्यावर आले होते. मनपाकडून नालेसफाईचे दावे केले जात असले तरी या पावसात मनपाच्या दाव्यांचे पूर्णपणे पितळ उघडे पडले.
रविवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास विजांचा कडकडाट व ढगांच्या गडागडाटासह शहरात सुमारे अर्धातास दमदार हजेरी लावली. नालेसफाई व्यवस्थित न झाल्यामुळे शहरातील मुख्य नाले व उपनाले सोडाच गल्लीबोळातील गटारीदेखील ओव्हर फ्लो झाल्यामुळे रस्त्यावर पाणीच पाणी साचले होते.
गायत्री नगराजवळील नाल्याचे पाणी रस्त्यावर
शहरातील शिरसोली रस्त्यालगत असलेल्या गायत्री नगराजवळील दवंड्या नाल्याची सफाईदेखील व्यवस्थित न झाल्याने रविवारी झालेल्या अर्ध्यातासाच्या पावसातच नाला ओव्हर फ्लो झाला होता. नाल्याचे पाणी लहान पुलावरून वाहत असल्याने याठिकाणी वाहने चालविताना वाहनधारकांना त्रास सहन करावा लागला. याठिकाणची ही समस्या कायमचीच आहे. नेहमी रस्त्यावर पाणी वाहत असल्याने रस्त्यावर मोठे खड्डे पडलेले आहेत.
विवेकानंद नगरात झाड पडले
विवेकानंद नगर भागात रविवारी झालेल्या पावसामुळे ५० वर्षे जुने निंबाचे झाड कोसळले. सुदैवाने यावेळी रस्त्यालगत वाहन नसल्याने मोठी दुर्घटना टळली. हे झाड रस्त्यावर पडल्यामुळे या रस्त्यावरची वाहतूक खोळंबली होती. तसेच यामुळे या भागातील वीजपुरवठादेखील खंडित झाला होता. यासह शहरातील खोटेनगर भागातदेखील एक लहान वृक्ष कोसळला होता. तर आशाबाबा नगर परिसरातदेखील पिंपळाच्या झाडाच्या फांद्या तुटून पडल्या.
नेहमीच्या ठिकाणी साचले पाणी
शहरात थोडा पाऊस झाला की, काही भागात नेहमीच पाणी साचण्याची समस्या निर्माण होत असते. वर्षानुवर्षे ही पाणी साचण्याची समस्या कायम असूनही यावर मनपा प्रशासनाला कायमचा तोडगा काढता आलेला नाही. रविवारीदेखील नवीपेठ, आकाशवाणी चौक, बी.जे.मार्केट परिसर, प्रभात चौक, भोईटे शाळा परिसर, नवसाचा गणपती मंदिर परिसर, ख्वॉजामिया चौक याठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते.
नालेसफाईचा केवळ देखावा, प्रत्यक्षात काम शून्य
शहरातील नालेसफाईचे काम यावर्षी अत्यंत निकृष्ट दर्ज्याचे झालेले दिसून येत आहे. मनपा प्रशासनाने केलेले नालेसफाईचे दावे पूर्णपणे फोल ठरत असून, नालेसफाईचा प्रशासनाकडून केवळ देखावा केलेला दिसून येत आहे. विशेष म्हणजे मनपाकडून आता लहान गटारी देखील साफ केल्या जात नसल्याने थोड्याशाच पावसात या गटारीदेखील ओव्हर फ्लो होत आहेत. मनपाने नालेसफाईवर केलेला २० लाखांचा खर्च अक्षरश: पाण्यात गेल्याचे चित्र यावर्षीच्या नालेसफाईवरून दिसून येत आहे.
पावसामुळे पिकांना जीवदान
रविवारी जळगाव शहरासोबतच तालुक्यातील शिरसोली, आव्हाणे, वडली, बिलवाडी, खेडी, फुपनगरी परिसरात देखील पावसाने दमदार हजेरी लावल्याने अनेक दिवसांपासून जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत असलेला बळीराजा सुखावला आहे. पावसामुळे सोयाबीन, कोरडवाहू कापसावर असलेले दुबार पेरणीचे संकट काही अंशी दूर झाले आहे. तर मूग, उडीदलादेखील या पावसामुळे जीवदान मिळाले आहे.