गेल्या काही दिवसांपासून शहरातील हवामानात मोठा बदल जाणवत असून, तापमानात जरी घट झाली असली तरी, उकाडा मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. शुक्रवारी सकाळपासून शहरात कडक ऊन पडले होते. मात्र, दुपारी ३ वाजेनंतर आकाशात ढगांनी गर्दी करत, थंड वारे देखील वाहू लागले होते. दुपारी चार वाजता पावसाच्या टपोऱ्या थेंबांसह सुमारे अर्धा तास पावसाने शहरात हजेरी लावली. दमदार पावसामुळे शहरातील नवी पेठ, शिवतीर्थ मैदान परिसर, बजरंग बोगदा परिसर या भागात पावसाचे पाणी साचले होते. तर कांचन नगर, गोपाळपुरा, शनिपेठ मंदिर परिसरात अमृतच्या कामांमुळे भयंकर चिखल पसरला. यामुळे वाहनधारकांना वाहने चालवताना देखील मोठी कसरत करावी लागली. शहरातील अनेक भागात दमदार पावसाने हजेरी लावली तर, दादावाडी, चंदू अण्णा नगर, खोटे नगर या भागात कमी प्रमाणात तर काही ठिकाणी पावसाने मात्र दडी मारल्याचे चित्र पहावयास मिळाले.
तालुक्यात मात्र पावसाची प्रतीक्षा
जळगाव शहरात शुक्रवारी जरी दमदार पावसाने हजेरी लावली असली तरी जळगाव तालुका परिसरात अजूनही शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. तालुक्यात जवळपास ४० टक्के हंगामपूर्व कापसाची लागवड झाली असून, शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा लागून आहे. शुक्रवारी जळगाव ममुराबाद, आव्हाने, भोकर, कानडदा या भागात ढगांनी गर्दी केली होती मात्र पाऊस न झाल्यामुळे शेतकरी निराश झाले आहेत.