लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा ग्रामपंचायत निवडणूक होत असून, या निवडणुकीत दक्षता घेतली जात आहे. कोरोनाबाधितांनाही मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी कोविडबाधित, विलगीकरण कक्षातील व्यक्ती तसेच दोनदा तपासणीनंतरही शरीराचे तापमान विहित निकषांपेक्षा जास्त असलेल्या मतदारांना मतदानाची वेळ संपण्याच्या अर्धा तास आधी प्रतिबंधात्मक उपायांचे काटेकोर पालन करून मतदान करता येणार आहे.
जिल्ह्यात ७८२ ग्रामपंचायतींची निवडणूक होत असून यामध्ये जे कोरोनाबाधित आहे, ते मतदानापासून वंचित राहू नये, यासाठी त्यांच्यासाठीही वेळ राखीव ठेवण्यात आला आहे.
सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होणार असून, प्रतिबंधात्मक क्षेत्रामध्ये वास्तव्यास असलेल्या मतदारांच्या शरीराच्या तापमानाची दोनदा तपासणी केली जाईल. त्यांचे तापमान विहित निकाषांपेक्षा जास्त नसल्यास, अशा मतदारांना सर्वसाधारण मतदारांप्रमाणे मतदान करता येईल.
क्वाॅरंटाइनसाठी मतदानाची वेळ राखीव
एखाद्या मतदाराच्या शरीराचे तापमान विहित निकषापेक्षा जास्त असल्यास पुन्हा दुसऱ्यांदा तापमान घेतले जाईल. ते कायम असल्याचे आढळल्यास मतदारास टोकन दिले जाईल आणि त्यास मतदान संपण्याच्या अर्धा तास आधी बोलविण्यात येईल. यासह विविध मार्गदर्शक सूचनादेखील आधीच देण्यात आल्या आहेत. सध्या जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या कमी असून, त्यांना आता हक्क बजावता येणार आहे.
मतदान केंद्रांवर सॅनिटायझरची व्यवस्था
जिल्ह्यातील बाधितांची संख्या व माहिती जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडून मागविण्यात आली आहे. मतदानाच्या एक दिवस आधी मतदान केंद्राची जागा व साहित्य सॅनिटाइज केले जाईल. प्रत्येक मतदान केंद्राच्या प्रवेशाच्या ठिकाणी थर्मल स्क्रीनिंगची व्यवस्था करण्यात येईल. सामाजिक अंतर राखण्याच्या दृष्टीनेदेखील दक्षता घेण्यात येईल. मतदारांच्या शरीराच्या तापमानाची तपासणीदेखील केली जाईल.
मास्क असताना ओळख पटणार?
मतदाराची ओळख पटण्यासाठी मतदारांना आवश्यकतेनुसार फेसमास्क काढावा लागेल. मात्र हे केवळ ओळख पटविण्यासाठी राहणार असून येताना, जाताना, मतदान करताना मास्क प्रत्येकाला वापरावाच लागेल.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत निवडणूक होत असल्याने संपूर्ण दक्षता घेतली जाणार आहे. क्वाॅरंटाइन नागरिकांनाही मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी शेवटचा अर्धा तास त्यांच्यासाठी राखीव ठेवण्यात आला आहे. तसे आदेश निवडणूक आयोगाने काढले असून उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
-नामदेव पाटील, तहसीलदार