ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 16- जिल्ह्याची अंतिम पैसेवारी जाहीर झाली असून 15 तालुक्यातील एकूण 1502 गावांपैकी 8 तालुक्यातील 814 गावांची पैसेवारी 50पैशांच्या आत असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. त्यात 7 तालुक्यांची पूर्णपणे पैसेवारी 50 टक्कय़ांच्या आत असून केवळ पारोळा तालुक्यातील काही गावे 50 पैशांच्या आत आहेत. तर 688 गावांची पैसेवारी 50च्या वर आहे. त्यामुळे 50पैशांच्या आत पैसेवारी असलेला निम्म्याहून अधिक जिल्हा दुष्काळी जाहीर होणार असून त्यानुसार उपाययोजना केल्या जातील. जिल्ह्यात यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. काही तालुक्यात बरा पाऊस झाला तरी परिस्थिती बिकट असल्याने संपूर्ण जिल्हा दुष्काळी जाहीर करण्याची मागणी होत होती. मात्र नियमानुसार पैसेवारीच्या आकडेवारीवरूनच दुष्काळ जाहीर करता येईल, असे पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले होते. त्यामुळे अंतीम पैसेवारीकडे जिल्ह्याचे लक्ष लागले होते. त्यानुसार शुक्रवारी अंतीम पैसेवारी जाहीर झाली. त्यात जिल्ह्यातील 1502 गावांपैकी 814 गावांची पैसेवारी 50च्या आत असून 688 गावांची पैसेवारी 50च्या वर आहे. 7 तालुके पूर्ण दुष्काळी15 पैकी 7 तालुक्यांमधील सर्व गावांची पैसेवारी 50च्या आत असल्याने हे संपूर्ण तालुकेच दुष्काळी ठरले आहेत. त्यात जामनेर (152 गावे), बोदवड (51), मुक्ताईनगर (81), पाचोरा (129), भडगाव (63),अमळनेर (154), चाळीसगाव (136 गावे) या तालुक्यांचा समावेश आहे.7 तालुक्यांची पैसेवारी 50च्या वर7 तालुक्यातील सर्वच्या सर्व गावांची पैसेवारी 50च्या वर आहे. त्यात जळगाव (92 गावे), एरंडोल (65 गावे), धरणगाव (89 गावे), भुसावळ (54 गावे), यावल (84 गावे), रावेर (121 गावे), चोपडा (117 गावे) या तालुक्यांचा समावेश आहे. पारोळ्याचा अपवादपारोळा तालुक्यातील 114 पैकी 48 गावांची पैसेवारी 50च्या आत असून 66 गावांची पैसेवारी 50च्या वर आहे.