जळगाव : सोन्याचे दागिने खरेदी-विक्रीसाठी १ जूनपासून भारतीय मानक ब्युरो अर्थात बीआयएस ‘हॉलमार्किंग’ आवश्यक राहणार असून यामुळे सोन्याच्या शुद्धतेची खात्री राहणार आहे. विश्वासार्हतेवर चालणाऱ्या या व्यवसायात यामुळे आणखी भर पडणार असून याचा ग्राहक तसेच सुवर्ण व्यावसायिक यांनाही लाभ होणार आहे. विशेष म्हणजे घरात असलेल्या जुन्या दागिन्यांसाठी याची सक्ती राहणार नसल्याने त्याची मोड केव्हाही करता येणार आहे.
दर्जा, शुद्धता, विश्वासार्हता आणि सचोटीचा व्यवहार याला सोन्याच्या व्यवसायात अनन्यसाधारण महत्त्व असते. आता या शुद्धतेच्या विश्वासार्हतेवर हॉलमार्किंगने आणखी भर पडणार आहे. १ जूनपासून सोन्याचे दागिने खरेदी-विक्रीसाठी बीआयएस ‘हॉलमार्किंग’ आवश्यक राहणार आहे. केंद्र सरकारने या प्रस्तावास तशी २०१९मध्येच मंजुरी दिली होती. त्यानंतर ते १ जानेवारी २०२०पासूनच लागू होणार होते. मात्र काही कारणास्तव हॉलमार्किंग सक्ती लांबली. त्यानंतर १५ जानेवारी २०२१पर्यंत त्याची मुदत देण्यात आली होती. मात्र कोरोनाचा संसर्ग वाढत गेला व त्यावेळी त्याची अंमलबजावणी लांबली. आता १ जूनपासून त्याची सक्ती करण्यात आली असून तशी अधिसूचनादेखील भारतीय मानक ब्युरोने काढली. सोने किती व इतर धातू किती, हे यामुळे कळणार आहे.
हॉलमार्किंग आवश्यक होणार असल्याने सरकारला त्यासाठी केंद्र सुरू करावे लागणार आहे. तसे जळगावात एक केंद्र सुरू असून सुवर्ण अलंकारांच्या सुरक्षिततेसाठी प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी हे केंद्र ठेवावे असे सुवर्ण व्यावसायिकांचे म्हणणे आहे. जिल्ह्याच्याच ठिकाणी केंद्र असल्यास तालुका व गावपातळीवरील सराफांना त्यांचे सोने संबंधित केंद्रावर आणावे लागेल. यात मोठा धोका संभवतो. त्यामुळे किमान तालुका पातळीवर हे केंद्र असावे, असा सूर यानिमित्ताने उमटत आहे.
तीन श्रेणीत शुद्धता
हॉलमार्किंगद्वारे सोन्याची तीन श्रेणीत शुद्धता मोजली जाणार आहे. यात २२ कॅरेट, १८ कॅरेट, १४ कॅरेट सोन्याची शुद्धता मोजून तशी केंद्रामार्फत खात्री दिली जाईल. यात ग्राहकांना शुद्ध सोने मिळण्याची व सुवर्ण व्यावसायिकांना अस्सल सोने असल्याचा दावा करता येणार असल्याने दोघांनाही याचा लाभ होणार आहे.
घरातील सोन्याची केव्हाही विक्री
हॉलमार्किंग सक्ती होणार असली तरी घरात असलेल्या जुन्या सोन्याबाबत काय, अशी चिंता अनेकांना राहणार आहे. नवीन सोने खरेदी-विक्रीत सोन्याची शुद्धता मोजावी लागणार असल्याने जुने सोने केव्हाही विक्री करता येणार आहे. यात पूर्वीप्रमाणेच सुवर्ण व्यावसायिक त्या सोन्याच्या शुद्धतेची त्यांच्याकडील उपकरणाद्वारे खात्री करू शकतील, असे सुवर्ण व्यावसायिकांनी सांगितले.
सुवर्णनगरी जळगावातील सोने अगोदरच प्रसिद्ध असून त्याबाबत एक विश्वासार्हता आहे. त्यात आता १ जूनपासून हॉलमार्किंग आवश्यक असल्याने यामुळे येथील सोन्याच्या शुद्धतेबाबत आणखी विश्वास वाढण्यास मदत होणार आहे. यासाठी सराफ व्यावसायिकास परवाना घ्यावा लागणार असून शुद्ध सोन्याची विक्री होत नसल्याचे आढळल्यास हा परवाना रद्द होऊ शकतो.
- स्वरूप लुंकड, सचिव, जळगाव शहर सराफ असोसिएशन