विजयकुमार सैतवाल, लोकमत न्यूज नेटवर्क, जळगाव : गेली काही दिवसांपासून घसरत गेलेले सोने-चांदीचे भाव आता हमास व इस्रायल यांच्यातील तणावानंतर पुन्हा वाढू लागले आहे. त्यामुळे शनिवार, ७ ऑक्टोबर रोजी चांदीच्या भावात एकाच दिवसात एक हजार ६०० रुपयांची वाढ झाली. तसेच, सोन्याचेही भाव ३०० रुपयांनी वधारले. त्यामुळे चांदी पुन्हा ६९ हजार रुपयांच्या पुढे जाऊन ती ६९ हजार ५०० रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे. सोनेदेखील ५७ हजार ९०० रुपये प्रति तोळा झाले.
गणेशोत्सव संपल्यानंतर पितृपक्ष सुरू झाला व सोने-चांदीचे भाव कमी होऊ लागले. आठवडाभरात सोने एक हजार ४०० रुपयांनी, तर चांदी चार हजार १०० रुपयांनी घसरली. सात महिन्यांतील नीचांकी भाव होते. त्यानंतर मात्र इस्रायल व हमास यांच्यातील तणावाचे रूपांतर हल्ल्यात होऊन हमासने पाच हजारपेक्षा जास्त रॉकेट इस्रायलवर डागले. त्यात अमेरिकेने या हल्ल्याविषयी केलेल्या वक्तव्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर आर्थिक घडामोडींवर मोठा परिणाम होणार असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. त्यात सोने-चांदीवर तर आंतरराष्ट्रीय घडामोडींचा लगेच परिणाम होतो.
त्यानुसार शनिवार, ७ ऑक्टोबर रोजी चांदीचे भाव थेट एक हजार ६०० रुपयांनी वाढले. त्यामुळे शुक्रवार, ६ ऑक्टोबरपर्यंत ६७ हजार ९०० रुपयांवर आलेली चांदी शनिवारी ६९ हजार ५०० रुपये प्रति किलो झाली. तसेच, ५ ऑक्टोबर रोजी ५७ हजार ४०० रुपयांवर आलेल्या सोन्याच्या भावात ६ ऑक्टोबर रोजी २०० रुपयांची, तर ७ ऑक्टोबर रोजी ३०० रुपयांची वाढ झाली. त्यामुळे सोने ५७ हजार ९०० रुपये प्रति तोळा होऊन ते पुन्हा ५८ हजारांच्या जवळ पोहोचले. हे युद्ध आणखी तीव्र झाल्यास सोने-चांदीसह अन्य घटकांवरदेखील त्याचा मोठा परिणाम होणार असल्याचे सांगितले जात आहे.
तणावाचा परिणाम
गेली काही दिवसांपासून सोने-चांदीचे भाव कमी झाल्यानंतर खरेदी वाढली. मागणी वाढल्याने आता पुन्हा भाव वाढत तर आहेच शिवाय हमास व इस्रायल यांच्यातील तणावाचा परिणाम सोने-चांदीच्या भावावर होऊन शनिवारी त्यांचे भाव वाढले. - मनीष जैन, सुवर्ण व्यावसायिक.