ठळक मुद्देप्रवर्तन चौकाने घेतला मोकळा श्वास तर अनेक संसार उघड्यावरकोणाचेही म्हणणे ऐकून न घेता अनेक दुकाने केली उद्धवस्त
मुक्ताईनगर : मुख्य चौकातील व मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण काढून शहराने मोकळा श्वास घेतला असला तरी अनेकांचे संसार उघड्यावर आला आहे.नगरपंचायत प्रशासनाने नगरपंचायतीच्या मालकीच्या जमिनीवर तसेच महामार्गाला अडथळा ठरणारे अतिक्रमण काढण्याच्या कारवाईला शुक्रवारी सकाळी सात वाजेपासूनच् सुरुवात केली. सुरुवातीला अर्धा तास अतिक्रमणधारकांना आपली दुकाने खाली करण्यास आदेश प्रशासनाने दिले. त्यानंतर मात्र कोणाचेही म्हणणे ऐकून न घेता अनेक दुकाने अक्षरशः उद्धवस्त करण्यात आली. शहरातील मुख्य प्रवर्तन चौक, भुसावळ रोड, जुने गाव रस्त , बोदवड रोड तसेच नवीन बसस्थानक व बऱ्हाणपूर रस्त्यावरील काही दुकानांचे अतिक्रमण चोख बंदोबस्तात काढण्यात आले. याप्रसंगी प्रवर्तन चौकात तहसीलदार श्वेता संचेती, नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी अश्विनी गायकवाड, पोलीस निरीक्षक सुरेश शिंदे, वरणगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप बोरसे, बोदवड पोलीस निरीक्षक आत्माराम गायकवाड, उपनिरीक्षक नीलेश सोळुंके, कैलास भारस्के यांच्यासह दोन दंगा नियंत्रण पथक व १०० पोलीस कर्मचाऱ्यांच्या बंदोबस्तात अतिक्रमण काढण्यात आले. मुक्ताईनगर शहरातून जाणारा इंदूर ते औरंगाबाद महामार्गाच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण याचे काम सुरू असून, यातील काही भागाचे चौकात बांधकाम अपूर्ण पडलेले होते. तसेच अतिक्रमणधारक दुकानदारांमुळे शहरात वाहतुकीची कोंडीदेखील वाढत होती. शहरातील व्यापाऱ्यांना हक्काची किंवा पालिकेचे व्यापारी संकुल नसल्याने उदरनिर्वाहासाठी छोटे-मोठे व्यवसायिकांना अतिक्रमण केल्याशिवाय या परिसरात पर्याय नव्हता. यामुळे या जागेवर अनेक वर्षांपासून अतिक्रमण करण्यात आले होते. त्याच अतिक्रमणधारकांवर शुक्रवारी नगरपंचायत प्रशासनाने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार कारवाई केली.यावेळी अनेक दुकानेही उध्वस्त झाली. प्रवर्तन चौकातील पानटपरीची अक्षरशः तोडफोड करण्यात आली, तर ज्या दुकानांचे पत्रे अथवा शटर हे गटारीच्या बाहेर आले होते ते पत्रे वाकवण्यात आले. आपल्या डोळ्यादेखत आपल्याच दुकानांची दुरवस्था पाहून अनेक दुकानदारांचे डोळे पाणावले. उदरनिर्वाहासाठी कोणतेही साधन नसल्याने अतिक्रमण करून दुकाने थाटणार्या दुकानधारकांची दुकाने जमीनदोस्त होत असल्याने अनेक घरांचे संसार उघड्यावर पडणार आहेत. यामुळे प्रवर्तन चौकातील दृश्ये विदारक दिसत होती. अतिक्रमण काढत असताना सकाळी सहा वाजेपासून हजारो नागरिकांची गर्दी जमलेली होती. परंतु चोख पोलीस बंदोबस्त व दंगा नियंत्रण पथक त्यामुळे कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडला नाही.मुक्ताईनगर शहरातील अतिक्रमणावर हातोडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2021 4:23 PM