- ज्येष्ठ नागरिक विचारमंच या संस्थेला दिली होती जागा
- कँटिनसाठी जागा असताना, तब्बल ८० फुटाचे बांधकाम करून, हॉटेल केले सुरू
- हॉटेलचे बांधकाम होत असताना, मनपाने दिला होता इशारा
- काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मनोज चौधरी यांच्या मालकीचे हॉटेल
- मोठ्या हॉटेलचालकाला दिली होती भाड्याने
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरातील ख्वॉजामिया चौकात असलेल्या मनपा मालकीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मनोज चौधरी यांनी अनधिकृतपणे बांधलेले हॉटेल मनपा अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून सोमवारी दुपारी ४ वाजता तोडण्यात आले. उद्यानात सुमारे ८० फुटाच्या वर पत्रे आणि प्लायवूडच्या साहाय्याने पक्के बांधकाम करून, गेल्या तीन महिन्यांपासून हे हॉटेल सुरू होते. मनपाच्या पथकाने उपायुक्त संतोष वाहुळे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई केली. यासह उद्यानात काही पक्के शेडदेखील बांधण्यात आले होते. या ठिकाणी अश्लील चाळे सुरू असल्याच्या अनेक तक्रारी नागरिकांनी केल्या होत्या. महिनाभरातील मनपाची तिसरी मोठी कारवाई ठरली आहे.
मनपा अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून गेल्या काही दिवसांपासून शहरातील मोठ्या अतिक्रमणांवर जेसीबी चालविण्याची कडक भूमिका घेतली असून, ख्वॉजामिया चौकातील अनधिकृत स्थळ, कालंका माता चौक परिसरातील पक्के बांधकाम, दफनभूमी भागातील अनधिकृत झोपड्यांवर कारवाई केल्यानंतर मनपाच्या पथकाने ख्वॉजामिया परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात अनधिकृतपणे बांधकाम केलेले हॉटेल जमीनदोस्त केले आहे. अचानक केलेल्या कारवाईत हॉटेल मालकाला बचावासाठी कोणताही वेळ मनपा प्रशासनाने मिळू दिला नाही.
मनपाची भूमिका
महापौर भारती सोनवणे यांनी आठवडाभरापूर्वी आपल्या पाहणी दौऱ्याच्या वेळेस हॉटेल मालकाला सात दिवसाच्या आत हे हॉटेल बंद करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर मनपा प्रशासनाने ५ रोजी आदेश काढत हे हॉटेल पाडण्याच्या सूचना दिल्या. या आदेशात म्हटले होते की, मनपा मालकीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात नोव्हेंबर २०२० मध्ये उभारण्यात आलेले हॉटेल हे बेकायदेशीर असून, या हॉटेलच्या उभारणीसाठी मनपाची कोणतीही परवानगी घेतलेली नाही, त्यानुसार हे हॉटेल निष्कासित करण्याचे आदेश शहर अभियंत्यांनी काढले होते.
संस्थाचालकांची भूमिका
महापौरांनी आदेश दिल्यानंतर ही जागा ज्या संस्थेला देण्यात आली आहे त्या ज्येष्ठ नागरिक विचारमंच या संस्थेच्या अध्यक्षांनी मनपा आयुक्तांना वकिलामार्फत नोटीस बजावली होती. या नोटिशीत म्हटले आहे की, ही जागा मनपाने संस्थेला ३० वर्षांच्या कराराने दिली होती. करारानुसार या ठिकाणी कँटिन उभारण्याचीही परवानगी संस्थेला दिली होती. त्यानंतर मनपाने कराराचा भंग करून, ही जागा ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर न्यायालयात याचिका दाखल करून, ही कारवाई थांबविली होती. मनपाने केलेली कारवाई ही न्यायालयाच्या आदेशाचा भंग करणारी असल्याचे संस्थाचालकांनी म्हटले आहे.
मनपाची जागा, संस्थेने दिली भाड्यावर
मनपाने ही जागा संस्थेला दिली होती. मात्र, दुसऱ्या जागेवर बांधकामाची परवानगी असताना इतर जागेवर हे बांधकाम करण्यात आले. बांधकाम करताना मनपाची परवानगी घेतली गेली नाही. तसेच ज्या संस्थेला ही जागा दिली होती त्या संस्थेने शहरातील कालंका माता चौक परिसरातील एका मोठ्या हॉटेल चालकाला हे हॉटेल भाडेतत्त्वावर दिल्याची माहिती मनपाच्या सूत्रांनी दिली आहे.
कारवाई थांबविण्यासाठी दबाव, मनपाने झुगारला
मनपाने ही कारवाई अचानकपणे केली असून, याबाबत ठराविक कर्मचारी व अधिकाऱ्यांनाच माहिती देण्यात आली होती. मनपाचे पथक कारवाईसाठी पोहचल्यानंतर थेट कारवाईला सुरुवात केली. यामुळे संस्थाचालक डिगंबर चौधरी यांचे पुत्र मनोज चौधरी यांनी कारवाई टाळण्यासाठी न्यायालयाच्या आदेशाची प्रत दाखविली. मात्र, मनपा उपायुक्तांनी चौधरी यांच्याकडे दुर्लक्ष करत कारवाई सुरूच ठेवली. त्यानंतर शहरातील काही प्रतिष्ठित राजकीय पदाधिकाऱ्यांनी ही कारवाई टाळण्यासाठी मनपाच्या अधिकाऱ्यांना फोनदेखील केले. मात्र, राजकीय दबाव झुगारत मनपाने ही कारवाई सुरूच ठेवली. तब्बल तीन तासानंतर सर्व हॉटेल तोडण्यात आले.
उद्यानातील ‘त्या’ खोल्याही तोडल्या
उद्यानात मनपाची परवानगी न घेताच तीन खोल्यादेखील बांधण्यात आल्या होत्या. या ठिकाणी काही रहिवासीदेखील होते. मात्र, या ठिकाणी अश्लील चाळे सुरू असल्याच्याही तक्रारी या उद्यानात येणाऱ्या नागरिकांनी मनपा प्रशासनाकडे केल्या होत्या. यानुसार मनपाने या खोल्यादेखील यावेळी तोडल्या.