जळगाव : महिन्याभरापूर्वीच हाताला काम मिळालेल्या प्रकाश मजन बारेला (२२, मुळ रा. किनगाव ता. यावल., ह.मु. सुप्रिम कॉलनी) या कामगाराचा कंपनीमध्ये मशिन सुरू करत असताना शॉक लागून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुधवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास सुप्रिम कॉलनी परिसरामध्ये घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
प्रकाश बारेला हा पत्नी व भावासोबत सुप्रिम कॉलनीत गेल्या महिन्याभरापासून वास्तव्याला होता. सुप्रिम कॉलनी जवळील एका प्लॉस्टिक रिसायकलींग करण्याच्या कंपनीत कामाला होता. त्याच कंपनीत त्याचा भाऊ अनिल देखील कामाला आहे. नेहमीप्रमाणे बुधवारी प्रकाश हा कामावर आला होता. दुपारी ३ वाजेच्या सुमारास कंपनीतील मशीन सुरू करत असताना, त्याला विजेचा जोरदार धक्का बसला. हा प्रकार इतर सहका-यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी त्याला उचलून तत्काळ जिल्हा रूग्णालयात उपचारार्थ नेले. मात्र, रस्त्यातच प्रकाश याचा मृत्यू झाला. वैद्यकीय अधिकारी यांनी सुध्दा तपासणीअंती त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास किरण पाटील करीत आहेत.
भावाचा मनहेलवणारा आक्रोशगेल्या तीन महिन्यापुर्वीच प्रकाश याचे लग्न झाले होते. कामाच्या निमित्ताने गेल्या महिन्याभरापासून पत्नी व लहान भावासोबत तो जळगावात आला होता. या घटनेमुळे बारेला कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. सायंकाळी रूग्णालयात भाऊ अनिल याने मनहेलवणारा आक्रोश केला. मयताच्या पश्चात वडील, पत्नी काजल, दोन भाऊ अनिल आणि बाळू असा परिवार आहे.