लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : दर्जा, शुद्धता, विश्वासार्हता आणि सचोटी या गुणांना कलात्मकतेची जोड देऊन देशभरात सुवर्ण अलंकारांच्या बाबतीत नावलौकिक मिळविण्यासाठी हातभार लावणारे सुवर्णनगरी जळगावातील बंगाली हस्त कारागीर निर्बंधामुळे आपापल्या गावी परतू लागले आहेत. सध्या जळगावात केवळ १० ते १५ टक्केच कारागीर असून ते देखील परत जाण्याची तयारी करत आहे. त्यामुळे ते कधी परतणार याची चिंता जळगावातील सुवर्ण व्यवसायासमोर निर्माण झाली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या ब्रेक द चेन मुळे जीवनावश्यक वस्तू वगळता सर्वच व्यवहार ठप्प झाले आहे. यातून सुवर्ण व्यवसायही सुटलेला नाही. सध्या सुवर्ण व्यवसाय बंद आहे, त्याची चिंता तर आहेच, सोबतच कलाकुसरीचे सुवर्ण अलंकार घडविण्यात ज्यांचा हातखंडा आहे, असे बहुतांश हस्त कारागीर आपापल्या गावी परतले आहेत. त्यामुळे ते परतण्याचीही चिंता आहे. यामध्ये बंगाली कारागिरांचा समावेश असून त्यांच्यापुढेही उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
ज्या शहरात १६० वर्षांपूर्वी एक ग्रॅमची अंगठीही तयार स्वरूपात मिळत नव्हती त्या जळगावच्या सराफा बाजारात हजारो प्रकारच्या अत्याधुनिक फॅशनच्या दागिन्यांची उपलब्धता एक ग्रॅमपासून तर पाहिजे त्या प्रमाणात सहजपणे उपलब्ध करुन देणाऱ्या जळगावच्या सुवर्णनगरीतील अलंकार केवळ देशातच नव्हे तर संपूर्ण जगभरात पोहचत आहे.
सहा हजार कारागिरांचा हातभार
जळगावातील सुवर्ण व्यवसायाने शुद्धतेवर भर दिला असून या शुद्धतेसोबतच आकर्षक कलाकुसरीने ते जगभरात पोहचले आहे. अलंकारांची ही घडण करण्यासाठी बंगाली कारागिरांचे हात रात्रंदिवस राबतात. जळगाव शहरात सहा हजार बंगाली बांधव या व्यवसायानिमित्त वास्तव्याला आहे. यात चार हजार हस्त कारागीर आहेत. मात्र कोरोनाच्या धास्तीने बहुतांश कारागीर हे आपापल्या गावी बंगालकडे परतले आहेत. काही जण जळगावात आहेत, मात्र कामच नसल्याने त्यांच्यासमोर मोठा प्रश्न निर्माण झाला असून तेदेखील गावी परतण्याच्या तयारीत आहे. आज येथील सुवर्ण व्यावसायिक त्यांना मदत करीत आहे, मात्र कारागीर गावी जाण्याच्या मनस्थितीत असल्याचे सांगण्यात आले.
निर्बंधानंतरही चिंता
सध्या जे कारागीर गावी गेले आहे, ते पुन्हा परत येतात की नाही, याची शाश्वती नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यात जे येथे आहे तेदेखील गावी जाण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे नंतर सुवर्णपेढ्या सुरू झाल्या तरी कारागिरांशिवाय व्यवसाय हा विचारच शक्य नसल्याचे सुवर्ण व्यावसायिकांचे म्हणणे आहे. कारण कोरोनाने सर्वांच्या मनात मोठी धास्ती निर्माण केली असून परप्रांतीय कोणताही कारागीर बाहेर पडण्यापूर्वी विचार करणार असल्याचे कारागिरांच्यावतीने सांगण्यात येत आहे. त्यामुळे सुवर्ण व्यावसायिक चिंतेत आहे. तसे पाहता जळगावात १२ हजार बंगाली कारागीर होते. मात्र गेल्या वर्षी ते गावी परतले व निम्मे कारागीर जळगावात आलेच नाही. त्यामुळे यंदाही ही चिंता राहणारच आहे.
------------------------
सध्या सुवर्ण पेढ्या बंद आहे. त्याची चिंता तर आहेच, सोबतच सुवर्ण अलंकार घडविणारे कारागीर देखील गावी परतले आहेत. त्यामुळे नंतरही याची चिंता राहणार आहे.
- गौतमचंद लुणिया, जिल्हाध्यक्ष, सराफ बाजार असोसिएशन, जळगाव.
--------------------------
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या ब्रेक द चेनमुळे अनेक बंगाली कारागीर गावी परतले आहे. आता येथे जे आहेत ते देखील जाण्याची तयारी करीत आहे.
- महेंद्र मायटी, सचिव, बंगाली गोल्ड असोसिएशन, जळगाव.