स्टार -८७९
जळगाव : सकाळी किंवा संध्याकाळी रस्त्याने फिरताय..किंवा बाजारात जाताय तर मोबाइल सांभाळा..आपला मोबाइल केव्हा चोरी होईल, हे सांगता येणार नाही. काव्यरत्नावली चौक, सागर पार्क व शहरातील कॉलनी भागासह पिंप्राळा बाजार, कासमवाडी बाजार व फुले मार्केट, गोलाणी मार्केट या भागात मोबाइल चोरीच्या घटना सातत्याने होतात. सध्या कडक निर्बंध असल्याने मोबाइल चोरीच्या घटना कमी झालेल्या असल्या तरी जनजीवन पूर्वपदावर आले की पुन्हा मोबाइल चोरीच्या घटना वाढतात.
शनिपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या अल्पवयीन मुलांच्या टोळीला पोलिसांनी मध्यंतरी पकडले होते. अल्पवयीन असल्याने पोलिसांना कारवाई करताना मर्यादा आहेत, त्याचाच गैरफायदा या टोळीकडून घेतला जातो. त्यामुळे त्यांच्याकडून सातत्याने असे गुन्हे घडत आहेत. २०१९ ते आतापर्यंत ९९२ मोबाइल चोरी झाले आहेत तर २३४ मोबाइल पोलिसांनी शोधून मूळ मालकाला परत केलेले आहेत. त्यातही अनेक जणांनी तक्रार दिलेली नाही. मोबाइल चोरी करणाऱ्या अनेक टोळ्या शहरात सक्रिय झालेल्या आहेत.
सध्या कोरोनाच्या संसर्गामुळे भाजी मंडई पूर्वीसारखी भरत नाही. तरीसुद्धा मोबाइल चोरीच्या दिवसाला दोन,चार तक्रारी पोलीस ठाण्यात येत आहेत. मात्र, मोबाइल चोरीस गेल्यानंतर अनेकजण तक्रार देत नाहीत. पुन्हा मोबाइल सापडणार नाही, अशी प्रत्येकाची धारणा होते. त्यामुळे बरेचजण तक्रार देत नाहीत. एखाद्या गुन्ह्यात जर हरविलेल्या मोबाइलचा वापर झाला तर मग ज्यांनी तक्रार दिली नाही त्यांच्यावर बालट येण्याची शक्यता असते. त्यामुळे आपला मोबाइल हरविल्यास पोलीस ठाण्यात जाऊन रीतसर तक्रार देणे गरजेचे आहे. सध्या मात्र, तक्रारींचा ओघ कमी झाला असल्याचे पोलिसांनी सांगितले.
मोबाइल हरवल्याच्या तक्रारी किती?
तक्रारी परत मिळाले
२०१९ -६०० १४०
२०२०-३५५ ८७
२०२१ -३७ ७
जानेवारी -
फेब्रुवारी
मार्च
एप्रिल
मे
जून
या ठिकाणी सांभाळा मोबाइल
-गोलाणी मार्केट परिसरात दिवसा मोबाइल लांबविण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडतात. गोलाणी मार्केटची ओळखच मोबाइल मार्केट अशी झाली आहे. त्यामुळे या भागातच जास्त खबरदारी घेणे गरजेचे आहे.
- काव्यरत्नावली चौक व सागर पार्क परिसरात सायंकाळी फिरायला जाणाऱ्यांचे दुचाकीवरून आलेल्या तरुणांनी मोबाइल लांबविल्याच्या घटना अनेकवेळा घडलेल्या आहेत. यात वृध्द, तरुण मुले, विद्यार्थी व महिला असे सर्वच प्रकाराच्या लोकांचे मोबाइल लांबविण्यात आले आहेत.
- मेहरूण तलाव परिसरात फिरायला जाणाऱ्यांची संख्या अधिक आहे. या भागात देखील धूम स्टाईल मोबाइल लांबविण्यात आलेले आहेत. त्याशिवाय मोहाडी रस्त्यावरदेखील मोबाइल लांबविले जात आहेत.
- फुले मार्केट, बळीराम पेठ, सुभाष चौक हा शहराचा मुख्य बाजाराचा भाग समजला जातो. या भागात रोज प्रचंड गर्दी असते. त्यामुळे येथून रोज मोबाइल चोरीचे प्रकार घडत आहेत. पिंप्राळा व कासमवाडी बाजारातूनही मोबाइल लांबविले जातात. काही जण पोलिसात तक्रार करतात तर काही जण करीत नाहीत.
५०टक्के मोबाइलचा तपास लागतच नाही
अनेकदा घरातून अथवा बाजारातून मोबाइल चोरीस गेल्यानंतर पोलीस ठाण्यात तक्रार दिली जाते. मात्र, चोरीस गेलेल्या मोबाइलचा शोध लागत नाही. त्यामुळे अनेकजण पोलीस ठाण्यात तक्रारच देत नाहीत. तसं पाहिलं तर पोलिसांनी मनावर घेतले तर जेवढे मोबाइल चोरीस गेले तेवढे मोबाइल सापडू शकतात. एखादा मोठा गुन्हा घडल्यानंतर पोलीस लोकेशनद्वारे मोबाइलचा शोध घेतात. खून करून एखादा पसार झाला असेल तर त्याच्या मोबाइलचे लोकेशन पाहून त्याला पकडले जाते. मात्र, रोजच्याच तक्रारी येत असल्याने त्यात गंभीर गुन्ह्यांचा तपास यामुळे मोबाइल चोरीचे गुन्हे मागे पडतात.
मोबाइल चोरी जाताच तातडीने हे करा
मोबाइल चोरीस गेल्यास अनेकदा काय करावे, हे बऱ्याच जणांना सुचत नाही. मात्र, घाईगडबड न करता मोबाइलमधील कार्ड ब्लॉक करणे गरजेचे आहे. तसेच तत्काळ पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल करावी. अनेकदा पोलीस तक्रार दाखल करताना मोबाइलची पावती मागतात. मात्र, त्यावेळी त्यांना पावती द्या. तक्रारीची पोहोच तुमच्याजवळ ठेवा. अधूनमधून पोलिसांना तपासाबाबत विचारणा करा.
कोट....
मोबाइल चोरी झाला असेल तर त्याची तक्रार लगेच घेतली जाते. किंबहुना प्रत्येकाची तक्रार नोंदवून घेण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. जळगाव जिल्ह्यात मोबाइल चोरीच्या घटनांची संख्या व शोध लागलेल्या मोबाइलची संख्या बऱ्यापैकी आहे. चोरीस गेलेले मोबाइल शोधून संबंधिताना परत देण्यात आलेले आहेत. बऱ्याचदा मोबाइल बंद असल्यामुळे पोलिसांना तपास करताना मोठ्या अडचणी ठरत असतात. परिणामी तपासाला दिरंगाई होते. नागरिकांनीही आपल्या मोबाइलची काळजी घेतली पाहिजे. विशेषत: गर्दीच्या ठिकाणी जाताना आपले पाकीट, मोबाइल सांभाळून ठेवला पाहिजे.
- डॉ.प्रवीण मुंढे, पोलीस अधीक्षक
-