जळगाव : इंटरनेटमुळे एकीकडे सर्व व्यवहार ऑनलाइन होत आहेत, तर दुसरीकडे सायबर गुन्हेगार त्याचा फायदा घेत आहेत. केवायसीच्या नावाने कॉल करून गोपनीय माहिती विचारली जात असून, त्यामुळे क्षणात बँक खात्यातील पैसा वळविला जात आहे. जळगाव जिल्ह्यात असे आठ गुन्हे दाखल झाले आहेत. या वाढत्या घटना लक्षात घेता केंद्रीय गृहमंत्रालय वेळोवेळी सरकारच्या ट्विटर हँडलच्या माध्यमातून लोकांना या नव्या पद्धतीने सतर्क करीत आहे.
केवायसीसाठी आपल्या मोबाइलवर कोणी लिंक पाठविली असल्यास मोहात पडू नका? याद्वारे आपल्या बँकेच्या खात्यातील पैसे गायब केले जाऊ शकतात. सध्या फसवणूक करणारे सायबर गुन्हेगार कॉल किंवा एसएमएस करून लोकांना केवायसी करण्याच्या नावाखाली फसवत आहेत. अशा प्रकारे, लोकांकडून त्यांचे वैयक्तिक तपशील मिळवून ते गुन्हेगारी उपद्रव करीत आहेत. गृहमंत्रालयाने लोकांना अशी कोणतीही चूक न करण्याचा इशारा दिला आहे. तसेच, तुमच्याकडे येणाऱ्या कोणत्याही कॉल, मेसेज किंवा ई-मेलवर आलेल्या कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका, असेही म्हटले असून सायबर पोलिसांकडून नागरिकांना वेळोवेळी सावध केले जात आहे.
अशी होऊ शकते फसवणूक
अ) अमुक बँकेतून बोलत असल्याचे सांगून तुमचे केवायसी अपूर्ण आहे, त्यामुळे बँक खाते बंद होऊ शकते. असे सांगून आधारकार्ड, मोबाइल क्रमांक, दिनांक, वैधता याची पडताळणी करावयाची असल्याचे सांगून गोपनीय माहिती विचारून फसवणूक झाल्याचे प्रकरण सायबर पोलिसांकडे आलेले आहे.
ब) ‘ॲनीडेस्क’ किंवा ‘टीम विव्हर’सारखे कोणतेही अॅप डाऊनलोड करणे टाळावे. अशा अॅपसह आपल्या डिव्हाइसवर रिमोट ॲक्सेस देत असल्यास, फसवणूक करणाऱ्यांना आपला पिन, ओटीपी, बँक खात्याचा तपशील इत्यादी माहिती मिळू शकेल. त्यामुळे आर्थिक फसवणुकीचे प्रकार घडलेले आहेत.
क) बनावट मेसेजबाबत सरकारकडून सतर्कता वेळोवेळी जारी केली जाते. यासह, तुम्ही अज्ञात नंबरवरील मेसेजवर विश्वास ठेवू नये आणि अशा मेसेजना फॉरवर्ड करणे टाळावे. जेणेकरून दुसरा कोणताही युजर्स फसवणुकीचा बळी पडू नये.
गेलेला पैसा परत मिळणे कठीण
ऑनलाइन फसवणूक झाली असल्यास तत्काळ सायबर पोलिसांशी संपर्क केला तर काही अंशी पैसे रोखले जाऊ शकतात. जळगाव जिल्ह्यात अजून तरी कोणाला पैसे परत मिळालेले नाहीत. त्यामुळे शक्यतो आपल्या बँक खात्याची माहिती कोणत्याही अनोळखी व्यक्तीला देऊ नये.
कोट
मोबाइलवर येणारे मेसेज काळजीपूर्वक वाचले पाहिजे. मोबाइलवर आलेले ओटीपी, पासवर्ड व जो १६ अंकी क्रमांक असतो तो कोणालाही सांगू नये. कोणतीही बँक कोणत्याही ग्राहकाचे बँक खाते व एटीएमसंबंधी माहिती विचारत नाही, त्यामुळे कोणालाही ही माहिती देऊ नये. शंका वाटली तर बँकेत जाऊन खात्री करावी.
- बळीराम हिरे, पोलीस निरीक्षक, सायबर पोलीस ठाणे