पाच हजारांपेक्षा अधिक प्राण्यांची भागविली भूक : जखमींवर केले जाते मोफत उपचार
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कठोर निर्बंधामुळे शहरातील हॉटेल, खाऊ गल्या बंद असल्याने भटक्या श्वानांच्या अन्नाचा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र, पशू पापा ॲनिमल प्रोटेक्शन संस्थेच्या कार्यकर्त्यांनी त्यांना अन्न देण्याचा उपक्रम सुरू केला आहे. पेडीग्री व भातद्वारे मोकाट श्वानांची भूक शमविण्याचा प्रयत्न केला जात असून, दोन महिन्यांत सुमारे पाच हजार मोकाट श्वानांना अन्नदान करीत भूक भागविण्यात आली आहे. या उपक्रमामुळे मुक्या प्राण्यांना आधार मिळाला आहे.
कोरोना विषाणूला रोखण्यासाठी प्रशासनाने शहरात कठोर निर्बंध लागू केले आहे. याचा फटका केवळ मनुष्यांनाच बसत नाही. त्याचे परिणाम पशुपक्षांवरही होत आहेत. शहरात मोकाट श्वानांचा बंदोबस्त त्वरित करा, अशी शहरात सार्वत्रिक जुनी मागणी आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून मोकाट श्वान, गुरे, मांजरांवर उपासमारीची पाळी आलेली आहे. भुकेमुळे त्यांचा मृत्यू होण्याची भीती व्यक्त केली जात होती. अखेर यांच्या मदतीला विद्यार्थ्यांनी स्थापन केलेल्या पशु ॲनिमल प्रोटेक्शन संस्था धावून आली आहे. या संस्थेकडून मोकाट श्वानांचा शोध घेऊन त्यांची भूक भागविली जात आहे. गेल्या दोन महिन्यांत पाच हजारांवर श्वानांची संस्थेने भूक भागविण्याचा प्रयत्न केला आहे.
पाचशेच्यावर प्राण्यांचा उपचार
पशु संस्थेने गिरणा पंपिंग परिसरात उपचार केंद्र सुरू केले आहे. शहरात जखमी अवस्थेत आढळून येणारे श्वान तसेच गायी, मांजरी, शेळी यांच्यावर वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मदतीने केंद्रात उपचार केले जाते. दोन महिन्यांत पाचशेच्यावर प्राण्यांवर येथे मोफत उपचार केले गेले. विशेष म्हणजे, या संस्थेत महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनींचा समावेश आहे.
आज भांडी वाटप
सध्या तापमानात कमालीची वाढ झाली आहे. या काळात पक्ष्यांची तहान भागविण्यासाठी नेहमीच सामाजिक संस्थांकडून परळ वाटप केले जाते. त्याचप्रमाणे भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त पशु ॲनिमल संस्थेकडून रविवारी भांडी वाटप केले जाणार आहे. या संस्थेमध्ये खुशबू श्रीश्रीमाळ, कोमल श्रीश्रीमाळ, हर्षल भाटिया, अनुज अग्रवाल, योगेश वानखेडे, गीत अरदेजा, सागर कर्डा, अभिषेक जैन, ललित चौधरी, योगेश कोल्हे, सुयश जाधव, संकेत महाजन, दीपांशू दोषी आदींचा समावेश आहे.