मुक्ताईनगर : तालुक्यात ११ पशुवैद्यकीय दवाखान्याचा कारभार फक्त एकच पशुधन विकास अधिकारी पाहत आहे. यामुळे पशुपालकांची प्रचंड गैरसोय होत आहे. दुर्दैव असे की, पशुधन विकास अधिकारी पाठोपाठ शिपाई (परिचर) संख्यादेखील अपूर्ण असल्याने उचंदे आणि रुईखेडा येथील पशुवैद्यकीय दवाखाने शिपायाच्या फिरत्या नियुक्त्या करून उघडले जात आहेत.
पशुवैद्यकीय अधिकारीच नसल्याने पशुधनावर उपचाराची जवाबदारी आता शिपाई हाताळत असल्याची परिस्थिती आहे. ग्रामीण भागात पशुधनावर उपचारासाठी पशुवैद्यकीय दवाखान्यात डॉक्टरच मिळत नाही, आणि मिळाले तर ते पशुधन मालकाचे भाग्य समजावे, अशी स्थिती आहे.
दवाखान्याला नेहमीच कुलूप
रुईखेडा व उचंदे येथे पशुवैद्यकीय दवाखान्याला कुलूप असणे हा प्रकार तर नित्याचा झाला आहे, आणि उघडले तर बाजाराच्या दिवशी उघडले जाते. उघडे मिळालेच तर डॉक्टर मिळतील याची खात्री नाही. सरते शेवटी दवाखाना उघडण्यास आलेला शिपाई डॉक्टरांची भूमिका पार पाडून त्याच्या कार्यक्षमतेने पशुंवर उपचार करतो. एकंदरीत कोरोना संकटाने हवालदिल झालेल्या नागरिकांनी आपल्या पशुंवर चिकित्सा करण्यासाठीही माेठा त्रास होताना दिसत आहे.
अशी आहे स्थिती....
तालुक्यात मुक्ताईनगर शहरात तसेच अंतुर्ली, कुऱ्हा, रुईखेडा, चांगदेव, उचंदे, निमखेडी बु, वडोदा, कर्की,कोथळी आणि हरताळे या ठिकाणी पशुवैद्यकीय दवाखाने आहेत. यात ७ पशुवैद्यकीय दवाखान्यात पशुधन विकास अधिकारी पद मंजूर आहे तर कर्की, कोथळी व हरताळे या तीन ठिकाणी पशुधन पर्यवेक्षकाची नेमणूक आहे. तिन्ही पशुधन पर्यवेक्षक वगळता सर्व ठिकाणचे पशुधन विकास अधिकारी पद रिक्त आहे. निमखेडी बुद्रूक येथे नियुक्ती असलेले डॉ. के. एल. डुघरेकर ही एकमेव व्यक्ती पंचायत समिती पशुधन विस्तार अधिकारी पाठोपाठ तालुक्यातील ११ पशुवैद्यकीय दवाखान्याचे पदभार हाताळत आहे. विशेष म्हणजे पशुधन पर्यवेक्षक याना पशुधनावर उपचारांच्या श्रेणीत न धरणाऱ्या प्रशासनाला तालुक्यातील कोथळी, हरताळे आणि कर्की या तीन पशुवैद्यकीय दवाखान्यात पशुवर उपचाराचा भार द्यावा लागला आहे. त्यामुळे किमान कोथळी, हरताळे आणि कर्की या तीन ठिकाणीच पशुधनावर उपचार सुरू आहे.
रिक्त पदांची भरमार
एकतर पशुधन अधिकाऱ्यांची मंजूर पदे ७ आहे व त्या पैकी फक्त एक पदभरलेले असून त्यांच्यावरही पं.स. विस्तार अधिकारीपदाचा भार दिला आहे. सोबतच तालुक्यातील १० पशुवैद्यकीय दवाखान्याचा कारभारही देण्यात आला आहे. परिचर/शिपाईसाठी येथे १६ पदे मंजूर आहे त्यापैकी ७ पदे भरलेली आहे. एक परिचारक अपघातामुळे ४ महिन्यांपासून वैद्यकीय रजेवर आहे.
अद्यावत दवाखाना चालवतो शिपाई तालुका लघु सर्व पशु चिकित्सालय या अद्ययावत पशुवैद्यकीय दवाखान्याची कर्मचारीअभावी अवस्था दयनीय आहे. सहाययक आयुक्त १, पशुधन विकास अधिकारी १ लिपिक, ड्रेसर आणि शिपाई अशी पदे मंजूर असलेल्या या पशुवैद्यकीय दवाखान्यात फक्त शिपाई हा एकमात्र कर्मचारी कार्यरत आहे. सहाय्यक आयुक्त आणि पशुधन अधिकारी पदावर बदलीने कर्मचारी अद्याप हजर झालेले नाही. अद्याप दवाखान्यात एक्सरे, सोनोग्राफी आणि पशूंचे ब्लड अनालयझर ही अद्ययावत उपकरणे मनुष्यबळाअभावी धूळखात आहे.
औषधी तुटवडाही पाठ सोडेना
डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांची वानवा असलेल्या तालुक्यातील पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये आणखी एका समस्येवर उपाय काही मिळून येत नाही. अधिक तर पशुवैद्यकीय दवाखाने औषध तुटवड्याच्या समस्येनेही ग्रासले आहेत. वरिष्ठ पातळीवर औषधी मागणी सुरू आहे, पण पुरेशी औषधी अद्याप तरी प्राप्त झालेली नाही.
आजारी बकरी आणली पं.स. कार्यालयात
तालुक्यातील पशुधन आरोग्य व्यवस्था टांगणीला असल्याने पशुंवर उपचारासाठी फिरफिर होत आहे. अशात बकरीवर उपचारासाठी डॉक्टर मिळत नसल्याने गेल्या पंधरवड्यात एका बकरी मालकाने आजारी बकरी घेऊन थेट पंचयात समिती कार्यालय गाठले. आणि उपचारासाठी डॉक्टर द्या असा आग्रह धरला.
रिक्त पदे भरण्याबाबत जिल्हा परिषदेकडे सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. त्याच प्रमाणे औषध साठाही मागितला आहे.
- आर. एल. जैन, प्रभारी सहाय्यक गट विकास अधिकारी पं.स. मुक्ताईनगर
130821\img-20210813-wa0099.jpg
उचंदे पशुवैद्यकीय दवाखाना या ठिकाणी डॉक्टर ही नाही आणि शिपाई ही नाही शिपाई च्या फिरत्या नियुक्ती च्या दिवशी हा पशुवैद्यकीय दवाखाना उघडला जातो