रवींद्र मोराणकरभुसावळ : बालपणीच्या रम्य आठवणीत रममाण व्हायला कुणाला आवडतं नाही? हा तर आयुष्याचा एक बहुमोल ठेवा आहे. अनेक गुरूंच्या प्रेमळ सहवासात घडलो असल्याचे भुसावळ येथील प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ.प्रदीप नाईक सांगतात.शिक्षक दिनाच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. १९६०-७० चा कालखंड. ना टीव्ही, ना स्कूटर, पळत पळत शाळेत जाता येईल इतकं छोटं भुसावळ गाव. शिक्षक, दयाराम शिवदास विद्यालय आणि खेळ हीच आयुष्याची एकमेव आनंदाची ठिकाणं.शिक्षक दिनानिमित्ताने गुरूंच्या स्मृतींना उजाळा मिळाला. इतके दिवस राहून गेलेले सर्व गुरूंना आदरांजली द्यायचं काम साधून घेता आलं. सगळ्यात जास्त आठवतात ते डी.एन.पाटील सर, ज्यांनी पाठीत घातलेला धपाटा अजूनही आठवण करून देतो की कुणालाही आपल्या पेपरमध्ये डोकावायलासुद्धा मदत करायची नाही. कॉपी करणं जेवढं पाप; तेवढंच ते करू देणंसुद्धा. त्यानंतर कधीही बेकायदेशीर गोष्टी करायला कधीही आवडलं नाही.मुजुमदार सर आठवतात ते सकाळी हातात मेहेंदीच्या झाडाची ताजी काडी घेऊन उभे असलेले. उशीर झाला की सपकन बसणारी काडी आठवली की कुठल्याही कामात वेळेच्या आधी पोहोचलो नाही तर त्यांची आवर्जून आठवण येते आणि हात हुळहुळतात.पी.टी.चे परमार सर अजूनही आठवतात ते त्यांच्या प्रेमळ स्वभावाने. मुलांना फुटबॉल शिकवताना ते रममाण होत असत. खो-खो, कबड्डी, लंगडी प्रत्येक खेळात भाग घ्यायला लावत असत. नंतर लष्करातल्या कथाही सांगत असत.शिंपी सरांच्या हिंदीच्या परीक्षांनी आमचे हिंदीचे ज्ञान समृद्ध झाले आणि आजही हिंदीची कठीण कविता, शेरोशायरी आम्हाला सहज उमगते.बी.आर. तळेले बीजगणिताचे मास्तर. खडू फेकून मारायचा त्यांचा नेम कधीच चुकला नाही. आम्ही त्या भीतीने, एकाग्रतेने गणितं सोडवायला लागायचो.खाचणे सर धोतर नेसणारे, अजूनही त्यांची मूर्ती, शास्त्र ह्या विषयात मन लावून शिकवण्यात रममाण होताना आठवते. त्यांनीच आम्हाला हवेत एक पंचमांश प्राणवायू असतो हे शिकवले. काचेच्या हंडीत मेणबत्ती विझल्यावर पाणी का वर चढते, हा प्रयोग, आज कोरोना काळात प्राणवायू फुफ्फुसात सोडताना वाक्य आठवते.बी.व्ही.पाटील आणि आर.एन.पाटील ही जोडगोळी, विद्यार्थीप्रेमी, सतत सोबतीने फिरणारे, तितकेच दोघेही स्वभावाने सौम्य पण गणितं शिकवण्यात हातखंडा. पहाटे पाचलासुद्धा ट्यूशनसाठी मुलं हजर असत. त्यांच्याकडून बोलण्यात किती मृदुता आणता येईल ते शिकलो. जे काही रुग्णांशी गोड बोलत असेल ती त्यांचीच कृपा.पळसुले सर बर्फाच्या कारखान्याजवळ रहात. आजही त्या रस्त्यावरून जाताना, सर असतील का असा धाक असतो. इंग्लिशचे स्पेलिंग पाठांतर झाले नाही की आरडाओरडा होणारच आणि कित्येकदा वही फेकून देण्यात येत असे. त्यांच्या भीतीने का होईना पण आमची जी काही इंग्रजी भाषा आहे ती सुधारण्यास मदत झाली.भट टीचरां (त्या वेळी मॅडम म्हणायची पद्धत नव्हती) मुळे आमचे संस्कृतचे प्रशिक्षण उत्तम झाले. आजही मराठीतल्या संस्कृत प्रचुर शब्दांची सहज फोड करताना त्यांची आठवण आल्यावाचून राहत नाही.फेगडे सर हे आधीच कठीण उच्च्चारण असलेले संस्कृत श्लोक चालीत गायला लावायचे.त्यांनी एकदा मोरोपंतांची आर्या शिकवली होती.‘केल्याने देशाटन, पंडित मैत्री, सभेत संचार, शास्त्र ग्रंथ विलोकन, मनुजा चातुर्य येतसे फार’. त्या आर्येचा पाठलाग अजूनही आयुष्यात सुरूच आहे. टेस्ट ट्यूब बेबीच्या शिक्षणासाठी १९८७ साली इंग्लंडला जाताना आणि नंतर अनेक देशात कॉन्फरंन्ससमध्ये मोठमोठ्या पंडितांशी भेट घेताना लहानपणीची ही आर्या साथीला होती.भिरूड सर तर आमचे आनंदी सर. शिवण कलेत त्यांचा हातखंडा. आजही पोटावर सर्जरी करताना आणि ते शिवताना त्यांची प्रकर्षाने आठवण येते.माझ्या आयुष्यात पुढेदेखील खूप महत्त्वपूर्ण शिक्षक, प्रताप कॉलेज, अमळनेर व बी.जे. मेडिकल कॉलेज, पुणे येथे आले व त्यांनी माझे आयुष्य घडवले. त्या सर्वांची खूप आठवण येते. या सर्वांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा.
अनेक गुरूंच्या प्रेमळ सहवासात घडलो -डॉ.प्रदीप नाईक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 05, 2020 12:46 AM
बालपणीच्या रम्य आठवणीत रममाण व्हायला कुणाला आवडतं नाही? हा तर आयुष्याचा एक बहुमोल ठेवा आहे.
ठळक मुद्देशिक्षक दिन विशेषडी.एन.पाटील सरांनी पाठीत घातलेला धपाटा आजही आठवतोलेट कमर्ससाठी मुजुमदार सरांची मेहेंदीच्या झाडाची ताजी काडी आजही डोळ्यासमोरबी.आर.तळेले सरांचा आगाऊ मुलांवर खडू फेकून मारायचा नेम कधीच चुकला नाहीधोतर नेसणा?्या खाचणे सरांची मूर्ती दिसते आणि कीर्तीही...