कला आणि कौशल्य हे दोन स्वतंत्र भाग आहेत़ यातली सीमारेषा पुसट आहे़ कला कधीच शिकता किंवा शिकवता येत नाही़ आपण शिकतो, ते कौशल्य़मी आनंदवनात असताना १९७८ साली बालमेळावा झाला होता़ संपूर्ण महाराष्ट्रातून खूप मुलं आली होती़ सोबत यदुनाथ थत्ते, मु़ ब़ शहा, चित्रकार दिलीप भंडारे अशी बरीच मंडळी आली होती़ एका मोठ्या हॉलमध्ये सर्व मुलांना पाठवून त्यांना चित्रकला साहित्य - पेपर, रबर, पेन्सील आणि रंग देण्यात आले आणि त्यांना सांगितलं गेलं़ ‘काहीही’ काढा’, असे सांगितल्यावर मुले गोंधळली, कारण त्यांना सवय झालेली होती की, सीन काढ झाड, डोंगर, नदी काढ काहीही काढा असं मुलांना कधीच सांगितलं गेलं नव्हतं़ आम्ही हॉलचे दार लावून घेतले आणि अर्ध्या तासाने दार उघडून आत गेलो़ एका मुलाने हत्तीचं चित्र काढलं होतं़ आणि हत्तीच्या डोक्यावर दोन मोठी मोठी शिंगे काढली होती़ यदुनाथजींनी त्या मुलाला विचारले , ‘बाळ तू हत्ती कुठे पाहिलास?’ तो म्हणाला, ‘सर्कशीत’ यदुनाथजी म्हणाले, ‘त्याला शिंग असतात का?’ तो म्हणाला, ‘नाही.’ ‘मग तू का काढलीस.’ ‘मला वाटलं, हत्तीहून मोठ्या प्राण्याने त्यांच्यावर हल्ला केला तर वरच्या बाजूला काहीतरी हवं म्हणून मी शिंग काढली.’या त्या बालमनाच्या हत्तीसाठी शुभेच्छाच आहेत़ त्या मुलाचे वाटणे यातच कलेचा जन्म आहे़ एखादे साधे विधान असते, वारा वाहतो आहे पण एखादा म्हणेल, मला वाटतं वारा म्हणजे डोळ्यातले पाणी पुसणारा आजोबा आहे किंवा एखादा म्हणेल, हा वारा म्हणजे अपरात्री फिरणाऱ्या अश्वत्थाम्याचा सखा आहे़ साºया कला या वाटते मध्ये आहेत़ वाटतेचे आभाळ अमर्याद आहे़ म्हणूनच वाटते, एखाद्याला शुभेच्छा देणे ही माणसाची भावनिक गरज असावी़ म्हणजेच संवाद साधणे ही माणसाची मूळ प्रवृत्ती आहे़ माध्यमे वेगवेगळी असू शकतात़किमया शुभेच्छा कार्डाची! या सदरामधून आपण माझी महाराष्ट्रभर पोहचलेली शुभेच्छा कार्डे पाहणारा आहात़ या शुभेच्छा पत्रांमधून तुम्हाला एका कलावंताचा तसेच छपाईच्या विकासाचा प्रवास दिसेल़ वाचन तसेच जगण्यातल्या प्रसगांच्या आठवणीमधून ही शुभेच्छा कार्डे साकारली आहेत़ १९९६ साली मी माझ्या मुलीला लिहिलेल्या पत्रात लिहिले होते, आपल्या बागेतल्या शेवंतीच्या कळ्या फुलवायला अजून तयार नाहीत़ कारण ढगाळ वातावरण उनच नाही़ उन्हानेच या आनंदविभोर होऊन उमलतील़ म्हणूनच उन्हाशिवाय, चटक्यांशिवाय, सफरिंगशिवाय आयुष्य फुलत नाहीत़ न पेलणारी स्वप्ने पाहिल्याशिवाय काही मिळवता येत नाही़ स्वप्नच नसेल तर मग प्रश्नच नाही. माझी दरवर्षीची शुभेच्छा कार्डे स्वप्नच तर आहेत़ माझी स्वप्ने पाहायला नुसते डोळेच नव्हे, समृद्ध मनही लागणार आहे़ मग आता बघा, किमयाची भावगर्भ शुभेच्छा कार्डे! (क्रमश:)-जयंत पाटील, जळगाव
दरवर्षीची शुभेच्छा कार्डे स्वप्नच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2020 11:48 PM