जळगाव : जीवन जगत असताना व्यसन, वाढलेले वजन, ताण-तणाव यामुळे हृदयविकाराचा धोका चारपट वाढत असतो. त्यामुळे नेहमी आनंदी रहा आणि हृदयरोग पळवा असा सल्ला पुण्याचे प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉ.रणजित जगताप यांनी रविवारी दिला.वैद्य भालचंद्र शंकर जहागीरदार प्रतिष्ठानतर्फे ‘माझे हृदय’ याविषयावर गंधे सभागृहात त्यांचे व्याख्यान झाले. यावेळी अध्यक्षस्थानी डॉ.मिलिंद वायकोळे, मेधा देशपांडे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष वैद्य जयंत जहागीरदार उपस्थित होते. धन्वंतरी स्तवन स्नेहल श्रावगी हिने सादर केले.वेळ व आरोग्याचे वेळीच नियोजन कराडॉ.रणजित जगताप म्हणाले की, वेळ आणि आरोग्य यांचे समीकरण योग्य पद्धतीने करा. वेळ निघून गेल्यावर अनेकदा आरोग्य निघून जाते. त्यामुळे आलेला प्रत्येक क्षण तेव्हाच आनंदाने जगा. आयुष्यात आतापर्यंत मी एक इंजेक्शन किंवा गोळी घेतली नाही असे अनेक जण म्हणतात मात्र तुम्ही निरोगी आहात का? असा सवाल त्यांनी केला.हृदयविकाराच्या प्रमाणात ४५ टक्के वाढआपल्या आरोग्य विषयी सजग असणे हे महत्वाचे आहे. १९८० पर्यंत हृदयविकाराचा धोका हा ४० वर्षानंतर निर्माण होत होता. मात्र आता ३० व्या वर्षापासून हा धोका वाढला आहे. आता हे प्रमाण ४५ ते ५५ टक्क्यांनी वाढले आहे. धूम्रपान, मद्यपान यावर नियंत्रण महत्वाचे आहे.३० वर्षानंतर करा नियमित आरोग्य तपासणीसुरुवातीला ४० व्या वर्षानंतर आरोग्य तपासणी करणे आवश्यक होते. मात्र आता ३० व्या वर्षापासून हा धोका निर्माण झाल्याने आरोग्य तपासणी आवश्यक आहे. पोट व कमरेचा घेर छाती पेक्षा कमी असल्यास नक्कीच आरोग्य चांगले राहिल असे त्यांनी सांगितले.पायी चालणे व सायकलींग उत्तम व्यायामहृदयरोग टाळण्यासाठी आहाराचे पथ्य महत्वाचे आहे. कोणत्याही गोष्टीचा अतिवापर हा घातक असतो. भरपूर नाश्ता, आवश्यक तेवढे जेवण आणि रात्रीचे थोडे जेवण असावे. पायी चालणे आणि सायकल चालविणे हा हृदयाचा सर्वात चांगला व्यायाम आहे.