जळगाव : कोरोनापासून शैक्षणिक सत्राचे बिघडलेले वेळापत्रक अजूनही पूर्वपदावर आलेले नाही. त्यामुळे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या उन्हाळी सुट्या पावसाळ्यातही आलेल्या आहेत. दरम्यान, शेजारच्या छत्रपती संभाजीनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या उन्हाळी सुट्या मात्र, १ मे ते १४ जूनपर्यंत आहेत. १५ जूनपासून त्यांचे शैक्षणिक सत्र सुरू होणार आहे.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने शैक्षणिक सत्र २०२२-२३ साठी प्रथम व द्वितीय सत्र यांचा प्रारंभ आणि शेवट याचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार उन्हाळी सुटी ४० दिवस मिळणार असून, त्याचा कालावधी दि. २४ मे ते २ जुलै २०२३ असा आहे. शैक्षणिक सत्र २०२३-२४ ची सुरुवात सोमवार, दि. ३ जुलै २०२३ पासून केली जाणार आहे. त्यामुळे खान्देशातील विद्यापीठाच्या उन्हाळी सुट्या पावसाळ्यात देखील प्राध्यापक व विद्यार्थ्यांना उपभोगता येणार आहेत.
दरम्यान, उन्हाळी सुट्या संपल्यानंतर लागलीच एक ते दीड महिन्यात विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची प्रक्रिया महाविद्यालयांना पूर्ण करावी लागणार आहे. बारावीचा निकाल लागल्यानंतर प्रथम वर्षाचे प्रवेश सुरू होतात. परंतु, यंदा जून महिन्यात आलेल्या सुटीमुळे प्रवेशाची प्रक्रिया नेमकी केव्हा सुरू होणार असा प्रश्न शिक्षण क्षेत्रातून उपस्थित केला जात आहे.
वेळापत्रक बदलाचा प्रस्ताव
कोरोनापासून शैक्षणिक सत्राचे वेळापत्रक विस्कळीत झाले आहे. ते पूर्वपदावर आणण्याचे विद्यापीठाचे प्रयत्न आहेत. उत्तरपत्रिकांची तपासणी दि. १५ जुलैपूर्वी पूर्ण होण्यासाठी आणि शासनाच्या निर्देशांनुसार १ ऑगस्टपासून नवीन शैक्षणिक सत्र सुरू करण्यासाठी वेळापत्रकात बदल केला जाऊ शकतो. तसा प्रस्ताव विचाराधीन आहे, अशी माहिती कबचौउमविचे प्र. कुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे यांनी दिली.