जळगाव : ओम नम: शिवाय, हर हर महादेव, बम बम भोलेच्या गजरात गुरुवारी शहरातील शिवालयांमध्ये महाशिवरात्री मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. ओंकारेश्वर मंदिरासह उपनगरांमधील मंदिरांमध्ये महाशिवरात्रीनिमित्त धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. बेलपत्र घेऊन शिवभक्त सायंकाळी उशिरापर्यंत मंदिरांमध्ये दर्शनासाठी आलेल्याचे पहायला मिळाले.
शहरातील ओंकारेश्वर मंदिरात सोमवारी सकाळपासून भाविक दर्शनासाठी आले होते़ मंदिरात पहाटे चारपासून मंदिर दर्शनार्थ उघडण्यात आले होते. पहाटे ५ ते ७ वाजेपर्यंत संजय जोशी, शरद जोशी, जितेंद्र जोशी यांच्याहस्ते अभिषेक करण्यात आला. त्यानंतर सात वाजता आरती झाली़ सकाळी १० ते दुपारी १२ पर्यंत अनिल जोशी यांच्याहस्ते अभिषेक झाला. दुपारी ४ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत पुन्हा अभिषेकाचा कार्यक्रम होऊन सायंकाळी ६ वाजता रामानंदनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक यांच्याहस्ते महादेवाची आरती करण्यात आली. महाशिवरात्रीनिमित्त मंदिरावर आकर्षक रोषणाई करण्यात आली होती़ दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिरातर्फे एलईडी स्क्रीन व ऑनलाइन दर्शनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. त्यामुळे यंदा प्रवेशद्वाराच्या बाहेरूनच भाविकांना दर्शनाचा लाभ घेता आला. दरम्यान, सत्संग भजन मंडळीच्या भजनांनी संपूर्ण परिसर भक्तिमय झाले होते. मंदिर परिसरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना प्रसादाचे वाटप सुरू होते. त्याचबरोबर हर हर महादेवचा गजरही केला जात होता. श्री सिद्धी व्यंकटेश देवस्थान येथेही महाशिवरात्रीनिमित्त आकर्षक सजावट व रोषणाई करण्यात आली होती. याशिवाय, भाविकांनी भोलेनाथाला बेलाचे पान अर्पण करून दर्शन घेतले.
प्रसादाचे वाटप
उपनगर पिंप्राळा येथील विठ्ठल परिसरातील शिव मंदिरातही महाशिवरात्रीनिमित्त प्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी सकाळपासून परिसरातील नागरिकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंग पाळत याठिकाणी भाविकांना दर्शनासाठी प्रवेश दिला जात होता.