जळगाव : मैत्रिणीचा कौटुंबिक वाद मिटविण्यासाठी गेलेल्या सामाजिक कार्यकर्त्या तरुणीचा मैत्रिणीच्या पतीने विनयभंग केल्याचा प्रकार रविवारी दुपारी घडला. याप्रकरणी राकेश राजेश गोटे यांच्याविरुद्ध सोमवारी पहाटे रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पिंप्राळा परिसरात सासर असलेल्या विवाहितेचा गेल्या तीन वर्षांपासून पतीसोबत कौटुंबिक वाद झाल्याने विवाहितेने सामाजिक कार्यकर्त्या तरुणीची भेट घेऊन तिच्याकडे कौटुंबिक वाद कथन केले. त्यानंतर मैत्रिणीला सोबत घेऊन रविवारी २५ मार्च रोजी विवाहितेच्या घरी जाऊन विवाहितेला नांदविण्यास सांगितले. त्यावर विवाहिताचे पती राकेश राजेश गोटे यांनी सामाजिक कार्यकर्त्या तरुणीस अश्लील शिवीगाळ करून लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. तर विवाहितेची सासू भारती राजेश गोटे यांनी शिवीगाळ करून खोटा गुन्हा दाखल करण्याचा दम दिला. यानंतर विवाहितेसह सामाजिक कार्यकर्त्या यांनी रामानंदनगर पोलीस ठाणे गाठले. विवाहितेच्या पतीसह सासूविरुध्द तक्रार दिली. दरम्यान, रामानंद नगर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी सुरुवातील तक्रार दाखल करण्यास टाळाटाळ केली. त्यानंतर अदखलपत्र गुन्हा दाखल केला.
पोलिसांविरुद्धही तक्रार
पीडीत तरुणीने यावेळी ड्युटीवर असलेल्या महिला पोलीस अमलदार श्रद्धा रामोशी व सागर कुमार देवरे यांच्याविरुद्धही सोमवारी पोलीस अधीक्षक यांच्याकडे लेखी तक्रार केली. दोघांनी आपल्याशी वाईट वर्तन करून कर्तव्यात हलगर्जीपणा केला आहे, त्यामुळे त्यांच्यावरही गुन्हा दाखल करावा, असे तक्रारीत म्हटले आहे.