अभिजित राऊत
जळगाव : १०० वर्षात कधीही कोणी पाहिले नसेल असे संकट संपूर्ण जगावर ओढवले आणि सर्व जण स्तब्ध झाले. जगाला वेठीस धरणाऱ्या कोरोना संसर्ग काळात चुकीच्या घटनांमुळे जळगाव जिल्ह्याचे नाव प्रकाशझोतात आले. त्यामुळे स्थिती नियंत्रणात आणणे व सोबतच जिल्ह्यातील नकारात्मकता दूर करणे असे दुहेरी आव्हान उभे राहिले; मात्र प्रशासकीय, आरोग्य, पोलीस अशा संपूर्ण यंत्रणेसह सामाजिक संस्थांच्या पाठबळामुळे जिल्ह्यावर ओढवलेले दुहेरी संकट परतवून लावण्यात यश मिळाले. आज जळगाव जिल्ह्यातील स्थिती नियंत्रणात आली असून, कोरोनाचे जे काही रुग्ण समोर येत आहेत, तेदेखील थांबविण्यास प्राधान्य राहणार आहे. पूर्णपणे नवीन असलेल्या या आजाराने मात्र संपूर्ण यंत्रणेला एक नवीन धडा दिला असून, अचानक ओढवलेल्या संकटाला कसे सामोरे जावे, यासाठी यंत्रणा सज्ज राहू शकणार आहे.
यंदाचे नवीन वर्ष कोरोना संसर्ग घेऊनच आले. यात केवळ जळगाव जिल्ह्यात नव्हे तर संपूर्ण तुमच्या गावाला वेठीस धरले गेले. पूर्णतः नवीन असलेल्या या आजाराविषयी कोणाला माहिती नव्हती आणि १०० वर्षात असा संसर्ग कोणी पाहिलेला नव्हता. त्यामुळे मोठे आव्हान उभे राहिले. सुरुवातीच्या काळात आलेल्या अडचणी यामुळे काहीसा संभ्रम निर्माण झाला होता. याच काळात जळगाव जिल्ह्यात रुग्ण संख्या वाढली व चुकीच्या घटनांमुळे जिल्ह्याचे नाव वेगळ्या पद्धतीने समोर आले. त्यामुळे केवळ कोरोनाची स्थिती नियंत्रणात आणणे एवढेच आव्हान नव्हते तर या घटनांमुळे जनतेत नकारात्मकतेचे वातावरण निर्माण झाले आहे ते दूर करणे, अशा दोन्ही पातळीवर काम करायचे होते. त्यादृष्टीने प्रशासनाच्यावतीने संपूर्ण नियोजन करण्यात आले. सोबतच सर्वच विभागांचे मोठे पाठबळ यासाठी मिळाले.
तसे मी जळगावात येण्यापूर्वी माझ्या पूर्वीचे जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांच्या काळातच वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय कोरोना रुग्णालय म्हणून करण्याचा निर्णय झाला होता. यासोबतच जिल्ह्यात चाचण्या वाढविणे गरजेचे असल्याने स्वतःची प्रयोगशाळा असावी, यासाठी प्रयत्न सुरू झाले. यात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी राज्यस्तरावर पाठपुरावा केला व जळगावात वेळेत प्रयोगशाळा सुरू झाली. यासोबतच जैन उद्योग समूहाकडून अतिरिक्त उपकरणे घेऊन तपासणीची क्षमता वाढविण्यात आली. शिवाय खासगी लॅबमध्येही तपासण्या करण्यास सुरुवात केली. सुरुवातीला १८० ते २०० पर्यंत तपासण्या होत असताना आता ही संख्या दोन ते अडीच हजारावर गेली आहे.
उपचार केंद्रांचे बळकटीकरण
जिल्हा पातळीवर कोरोना रुग्णालय सुरू करण्यासह तालुका पातळीवरदेखील खासगी रुग्णालय व शैक्षणिक संस्था या रुग्णांच्या उपचारासाठी उपलब्ध करून देण्यात आल्या. त्या ठिकाणी कोविड केअर सेंटर, डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल सुरू करण्यासह जिल्ह्यात होम क्वारंटिनची परवानगी देण्यात आली. अशा उपचार केंद्रांच्या बळकटीकरणामुळे रुग्णांना वेळेवर उपचार मिळणे शक्य झाले व त्यांचे निदान व आजारापासून मुक्ती लवकर होऊ लागली. या सर्व प्रक्रियेत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय तसेच जिल्ह्यातील उप-जिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणीदेखील आरोग्य यंत्रणेच्या चांगल्या सोयी उपलब्ध झाल्या. कोरोनाचे हे संकट असले तरी याच काळात जिल्ह्यासाठी या मोठ्या उपलब्धी ठरणाऱ्या सुविधा कायमस्वरूपी रुग्णसेवेत राहणार आहेत.
२५०० पेक्षा अधिक ऑक्सिजन बेडची सुविधा
कोरोना पूर्वी जिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन बेड उपलब्ध होते. इतरत्र ऑक्सिजन बेडची उपलब्धता म्हणजे मोठी खर्चिक बाब ठरणारी होती; मात्र कोरोनाच्या काळात जिल्ह्यातील ऑक्सिजन बेडची संख्या हळूहळू वाढून ३६० वर पोहोचली. त्यानंतर ती ५०० झाली व आता जिल्ह्यात २५०० पेक्षा अधिक ऑक्सिजन बेड उपलब्ध झाले आहेत.
जनतेत निर्माण झाला विश्वास
कोरोना रुग्णालयात रुग्ण दाखल केल्यानंतर त्यांची काय स्थिती आहे, याविषयी कुटुंबीयांना चिंता वाटणे स्वाभाविक आहे; मात्र रुग्णालयात या रुग्णांना योग्य उपचार मिळण्यासह त्यांची देखभालदेखील केली जाते, हा विश्वास निर्माण करण्यासाठी कोरोना रुग्णालयामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले, तसेच बेड असिस्टंट यांची नियुक्ती करून जनतेचा विश्वास जिंकला व आपला रुग्ण बरा होत आहे, याची खात्री कुटुंबीयांना होऊ लागली.
माऊथ पब्लिसिटीने विश्वासात भर
कोरोना रुग्णालय असो की कोविड केअर सेंटर, अथवा इतर ठिकाणी मिळणाऱ्या उपचाराविषयी रुग्ण नातेवाईक व इतर मित्र परिवारांना अनुभवातून सांगू लागले. एक प्रकारे यंत्रणेच्या कामगिरीची जनतेनेच माऊथ पब्लिसिटी केली, त्यामुळे यंत्रणेवरील विश्वास द्विगुणित होण्यास मदत झाली. यात माध्यमांचाही मोठा सहभाग राहिला. त्यांनी येथील नियंत्रणात येणारी स्थिती व उपलब्ध साधन सामग्री जनतेसमोर मांडल्याने जनतेलाही याचे महत्त्व पटले. एवढ्यावरच न थांबता प्रशासनाच्यावतीने कॉल सेंटर सुरू करण्यात येऊन रुग्णांशी संपर्क साधने व उपचार केंद्राच्या ठिकाणी त्यांची योग्य काळजी घेतली जात आहे की नाही, याविषयी पाठपुरावा घेण्यात येऊ लागला.
पडद्यामागचे व्यवस्थापन
रुग्णालयात सेवा देणे असो की परिस्थितीनुसार निर्णय घेणे असो, हे काम अधिकारी-कर्मचारी करीत असतानाच या परिस्थितीमध्ये पडद्यामागचे व्यवस्थापनदेखील महत्त्वाचे ठरले. यात ऑक्सिजनचा नियमित पुरवठा होत आहे की नाही, औषधांची कुठे कमतरता आहे का, याचा सातत्याने पाठपुरावा घेण्यासाठीदेखील यंत्रणा कार्यान्वित राहिली. त्यामुळेच रुग्णांना वेळेवर व पुरेसे उपचार देणे शक्य झाले.
लोकसहभाग महत्त्वाचा
शासकीय यंत्रणा कामकाज करीत असतानाच विविध सामाजिक संस्थांनीदेखील मोठी मदत केली. या संस्थांनी जनजागृती करण्यासह उपचार मिळण्यासाठीदेखील साधनसामग्री उपलब्ध होण्यासाठी मदत केली.
दोन महिन्यांपासून रुग्णसंख्या सातत्याने कमी
एकेकाळी हजाराच्या पुढे दररोज रुग्ण येत असताना ही रुग्णसंख्या गेल्या दोन महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात कमी झाली असून, १७ सप्टेंबरपासून तर ॲक्टिव रुग्ण घटण्यास सुरुवात झाली व आतादेखील हे प्रमाण पूर्वीच्या तुलनेत खूप कमी आहे. सध्या मृत्यूदेखील कमी झाले आहेत; मात्र येणारी रुग्णसंख्यादेखील शून्यावर आणणे, तसेच प्रत्येक मृत्यू रोखणे गरजेचे आहे, यासाठीदेखील प्रयत्न सुरू आहेत.
पुढची वाटचाल महत्त्वाची
सध्या जिल्ह्यात रुग्णसंख्या व मृत्यूदर कमी होत असल्याचे चित्र असले तरी नागरिकांनी योग्य दक्षता घेणे गरजेचे आहे. कोरोनावर लस येईल तेव्हा येईल, मात्र सध्या स्वतःची काळजी हाच सर्वोत्तम उपाय आहे. कोठेही गाफील न राहता सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे, मास्क वापरणे, वारंवार हात धुणे हा सर्वोत्तम पर्याय आहे. आज मास्क अत्यंत गरजेचे असून, मास्क वापरणाऱ्यांना संसर्ग झाल्याचे फार कमी उदाहरणे आहेत. त्यामुळे वेळीच दक्षता घेणे गरजेचे आहे.
आनंद साजरा करा, मात्र बंधने पाळून
सध्या लग्न व इतर कार्यक्रमांसाठी परवानगी दिली असून, काही बंधने कमी केली आहेत; मात्र यात कोठेही गाफील राहू नये व क्षणिक आनंदासाठी, आयुष्यभरासाठी अडचण करून घेऊ नये, याला प्राधान्य देणे गरजेचे आहे.