ऋतूनिहाय उपलब्ध फळांचे महत्त्व मानवी आरोग्य आणि पोषणासाठी अनन्यसाधारण आहे. जीवरक्षक आणि पुष्टी प्रदान करणारी ही फळे आता अत्यंत घातक रसायनांच्या साहाय्याने पिकवली जात आहेत. त्यामुळे ती फळे जीवघेणी ठरू लागली आहेत. त्यात प्रामुख्याने केळी, चिकू, आंबे आणि पपईचा समावेश आहे. ज्या रसायनांच्या साहाय्याने ही फळे पिकवली जातात ती खूप शक्तिशाली आहेत. ज्या फळांना नैसर्गिकरीत्या पिकण्यासाठी किमान चार दिवस ते एक आठवडा लागू शकतो, ती फळे या रसायनांच्या साहाय्याने अवघ्या काही तासांत पिकवली जातात. काही फळांमध्ये कागदात गुंडाळलेल्या कॅल्शियम कार्बाइडच्या पुड्या ठेवल्या जातात. त्यामुळे अनैसर्गिक पद्धतीने प्रचंड उष्मा तयार होऊन फळे पिकतात. या रसायनाला ‘बम’ हा सांकेतिक शब्द आहे. काही फळांवर विशिष्ट रसायनांचा स्प्रे मारून ती पिकवली जातात तर केळी विशिष्ट रसायनयुक्त पाण्यात भिजवून पिकवली जातात. आता तर केळी पिकवण्यासाठी देशी रसायनांऐवजी अतिघातक चायनीज रसायनेही उपलब्ध झाली आहेत.
दुधासाठी ऑक्सिटोसिनचा वापर
दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या बाबतीतही अशीच भयावह स्थिती आहे. अगदी आपल्या डोळ्यादेखत जेथे म्हशीचे दूध मिळते, तेही अनेक रोगांना घरबसल्या आमंत्रण देऊ शकते. अनेक दूध विक्रेते म्हशीचे दूध काढण्यापूर्वी त्यांना ऑक्सिटोसिन हे इंजेक्शन देतात. त्यामुळे म्हैस जास्त दूध देते. या इंजेक्शनमुळे कालांतराने म्हशींनाही खूप शारीरिक समस्या निर्माण होतात. मानवी जीवनावरही त्यातही बालके, मुली व महिलांच्या आरोग्यावर याचा खूप वाईट परिणाम होतो. या इंजेक्शनवर महाराष्ट्रात बंदी आहे. मात्र गुजरात व सौराष्ट्रातील गुरे विक्री करणारे व्यापारी खान्देशात व्यवसाय करण्यासाठी नियमित येतात तेव्हा ते लपून-छपून याची विक्री करतात.
कोट
हल्ली अनेक जण हृदयरोगासह श्वसन संस्था, पचनसंस्था, यकृत, स्वादुपिंड तसेच मूत्रपिंडाच्या संसर्गासह विविध रोगांनी बाधित झाले आहेत. नवनवीन प्रकारचे रोग व आजार उद्भवत आहेत. काही तर वैद्यकशास्त्रालाही अनाकलनीय व आव्हानात्मक आहेत. यापैकी अनेक रोग फळे पिकवणाऱ्या घातक रसायनांमुळे तथा भेसळयुक्त दूध व दुग्धजन्य पदार्थांशी निगडित आहेत.
- डॉ. प्रशांत शिंदे,
अमळनेर