जळगाव : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना ईडीची नोटीस देऊन सुरू करण्यात आलेल्या चौकशीच्या निषेधार्थ सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसकडून आंदोलन करण्यात आले. यावेळी, ‘वॉशिंग पावडर ईडी’ व ‘भाजप हटाव, लोकशाही बचाव’ अशी घोषणाबाजी करीत राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणून सोडला.
सोमवारी जयंत पाटील यांच्या विरोधातील चौकशीच्या निषेधार्थ तसेच ईडी व भाजपविरोधात राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी अल्पसंख्याक आघाडीचे प्रदेश सरचिटणीस एजाज मलिक, महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी, महिला महानगराध्यक्ष मंगला पाटील, रिंकू चौधरी, सुनील माळी, कल्पना पाटील, सलीम इनामदार, योगेश देसले यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. निवडणूक जवळ आल्यामुळे भाजपकडून ईडी, सीबीआय या यंत्रणांचा विरोधकांवर वापर केला जातो.
जनतेसाठी काम करणाऱ्या नेत्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप या निवेदनातून करण्यात आला आहे. जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. अवकाळी पाऊस, गारपिटीमुळे जिल्ह्यातील शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. चांगल्या भावाअभावी शेतकऱ्यांचा कापूस घरात पडून आहे. जिल्ह्यातील अनेक प्रकल्प रखडले आहेत. ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन व पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी या प्रश्नांकडे लक्ष देण्याची मागणी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ॲड. पाटील यांनी केली.